ती दोन मंत्रिपदं नाहीच… शिंदे गटाची होणार ‘या’ खात्यांवर बोळवण; संभाव्य लिस्ट आली समोर

| Updated on: Dec 01, 2024 | 12:09 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापनेत विलंब होत असून, शिंदे गटाला अपेक्षित खाती मिळत नसल्याने नाराजी आहे. भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवल्याने आणि शिंदे गटाला महत्त्वाची खाती जसे की गृह आणि महसूल देण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गटाला फक्त नऊ खाती मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार गटाला अधिक महत्त्वाची खाती मिळण्याची चर्चा आहे. विधानसभा आणि परिषद अध्यक्षपदावरही भाजपचे वर्चस्व असण्याची शक्यता आहे.

ती दोन मंत्रिपदं नाहीच... शिंदे गटाची होणार या खात्यांवर बोळवण; संभाव्य लिस्ट आली समोर
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटले तरी अजून नवीन सरकार स्थापन झालेलं नाही. निकालात भाजप मोठा भाऊ ठरल्याने महायुतीत आधी मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. पण भाजपने घटक पक्षांना मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर खाती वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली होती. पण त्यातही शिंदे गटाच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळेच सरकारचा शपथविधी रखडल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाला दोन महत्त्वाची खाती हवी होती. ती खाती त्यांना देण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहमंत्री आणि महसूल खात्याची मागणी केली होती असं सांगितलं जात आहे. मात्र, शिंदे गटाला देण्यात येणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यात या दोन्ही पदांचा उल्लेख नाहीये. त्यामुळे शिंदे गटाला या दोन्ही खात्यांपासून वंचित राहावं लगाणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. शिंदे गटाला तूर्तास फक्त 9 खाते मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात परिवहन खात्याचाही समावेश नसल्याचं दिसून येत आहे.

शिंदे गटाला कोणती खाती मिळणार?

एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकूण नऊ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, पीडब्ल्यूडी आणि रोजगार हमी ही खाती शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर गृहमंत्री आणि ओबीसी मंत्रालय भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. महसूल खातंही भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अजितदादा वरचढ ठरणार?

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा गट वरचढ ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थ खात्यासह आताची सर्व खाती अजितदादा गटाला दिली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे महत्त्वाची खाती अजितदादा गटाकडे जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा, विधान परिषद अध्यक्षपद कुणाकडे?

विधानसभा अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या सभापतीपदाबाबतही अजून निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ही दोन्ही महत्त्वाची पदे आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे. तर विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी शिंदे गट आणि अजितदादा गट आग्रह धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचा सूचक इशारा

तिन्ही नेते दिल्लीतून आल्यावर महायुतीची बैठक होणार होती. पण शिंदे दरेगावी गेल्याने ही बैठक दोन दिवसाने पुढे ढकलली. 3 तारखेला बैठक होणार असल्याचं सांगितलं गेलं. पण त्यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख घोषित केली आहे. शिंदे आणि अजितदादा गटासोबतच्या बैठकीआधीच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत राजभवनात गेले होते. पण सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे कोणताही दावा न करताच भाजपने शपथविधीची तारीख जाहीर केल्याने भाजपने एकप्रकारे एकनाथ शिंदे यांना सूचक इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे.