मुंबई | 10 डिसेंबर 2023 : तुम्ही पूर्वी एका राजकीय पक्षाशी (आम आदमी पार्टी) संबंधित होता. तुमचा तिकडे काय अनुभव होता, मला माहिती नाही पण तुम्ही आमच्या सोबत आलात तर काम अधिक चांगलं होईल कारण आम्हीही ‘आम आदमी’साठी काम करतो, अशी मिश्किल टिप्पणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवी कुमार विश्वास यांना थेट शिवसेना पक्षप्रवेशाची जाहीर ऑफरच दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑफर ऐकून मंचावर बसलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
मुंबईत सीएसआर जर्नल एक्सलन्स 2023 पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कवी कुमार विश्वास उपस्थित होते. या कार्यक्रमात कुमार विश्वास यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कवी कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.
कवी कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं म्हटल्यावर साहजिक त्यांनीही विश्वास यांची तारीफ करण्यात कसर ठेवली नाही. आपणही पूर्वी एका राजकीय पक्षात काम करत होतात. तुम्ही आमच्यासोबत आलार आम्हाला आनंद होईल, काम अधिक चांगलं होईल कारण आम्हीही आदमीसाठी काम करतो, अशी फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावर सभागृहात बसलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीला दाद दिली.
दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या कल्याणाचे सामाजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना मुख्यमंत्री @mieknathshinde केंद्रीय मंत्री @rajnathsingh यांच्या हस्ते #जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिला… pic.twitter.com/cVvvCGuw81
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 9, 2023
या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी सना खान हिचाही सन्मान करण्यात आला. सना खान या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तिच्यावतीने स्वत: आमिर खान याने पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव पुरस्काराच्या यादीत होते. तेही कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही मुलाचा पुरस्कार स्वीकारला.