मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Maharashtra Congress) इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला अंतिम स्वरुप द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने (Maharashtra Congress) सर्वच्या सर्व 288 मतदारसंघातल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यातल्या प्रत्येक मतदारसंघातून तीन नावं दिल्लीला पाठवली जाणार आहेत.
काँग्रेसमुक्त भारत असा भाजपचा नारा असला तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा पातळीवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर काँग्रेसने आता मतदारसंघाची चाचपणी करायला सुरुवात केली. प्रत्येक मतदारसंघात किमान तीन उमेदवारांची नावं काँग्रेसने तयार करायला घेतली आहेत. त्यातून निवडलेल्या इच्छुकाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे एकीकडे आघाडीची चर्चा सुरु असली तरी काँग्रेस 288 मतदारसंघावर उमेदवारांची तयारी करताना दिसत आहे. ही तयारी पक्षासाठी असल्याचं नेत्यांचं म्हणणं असलं तरी 2014 सारखी ऐनवेळ धावपळ होऊ नये यासाठी ही तयारी केली जात असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे भाजपला आव्हान द्यायला काँग्रेस तयार असल्याचा संदेश दिला जातोय. पण काँग्रेसची राज्यातील परिस्थिती सर्वांना माहित आहे. आम्हाला आव्हान वाटतं नाही, अशी प्रतिक्रियी भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली.
काँग्रेसच्या दिल्लीच्या पातळीवर अध्यक्षपदाचा घोळ असल्यामुळे राज्यात विस्कळीतपणा आला होता. आता आघाडीत चर्चा सुरु असून 240 जागांपर्यंत दोन्ही पक्षांशी बोलणं सुरु आहे. उरलेल्या जागांवर घटकपक्षांशी चर्चा सुरु असली तरी त्यात वंचित आघाडी बरोबर असण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकाप, डावे यांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचा काँग्रेसचा प्रयत्न दिसून येत आहे.