रणनीती बनवली आहे, आमदार फुटण्याचं धाडस कोणी करणार नाही : बाळासाहेब थोरात

| Updated on: Nov 05, 2019 | 2:44 PM

आम्ही काही रणनीती बनवली आहे, राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधी यांना कळवली आहे, असं थोरात म्हणाले.

रणनीती बनवली आहे, आमदार फुटण्याचं धाडस कोणी करणार नाही : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : शिवसेना-भाजपचा सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना, तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आपआपल्या चाली खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक होत आहे, तर काँग्रेसच्याही भेटीगाठी सुरु आहेत (NCP Leaders Meeting). काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधींना सांगितल्याची माहिती माध्यमांना दिली. आम्ही काही रणनीती बनवली आहे, राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधी यांना कळवली आहे, असं थोरात म्हणाले.

“विधानसभेच्या निवडणुकीत जनमत भाजपच्या विरोधात गेलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सरकार बनलं पाहिजे, भाजपने बनवावं, पण सध्या तसं घडताना दिसत नाही. याला कारण भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही,याला जबाबदार भाजप आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरुन जाणार नाही. आमदार फुटतील अशी आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. आता कोणी फुटण्याचे धाडस करणार नाही आणि कोणी फुटलं तर आम्ही सगळे मिळून त्याचा पराभव करु, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिला.

अध्यक्ष निवडीची वेळ आली तर आघाडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाला तर सरकारचा पराभव असतो, असं थोरात म्हणाले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. काळजीवाहू सरकार आहे तर त्यांनी जनतेची काळजी घ्यावी, असा सल्ला थोरातांनी दिला.