मुंबई : दुष्काळी कामावरुन प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिलं आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत”, असं अनिल परब यांनी नमूद केलं.
सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रामाणिक हेतू दिसत आहे. युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचार झाल्याचा एकही आरोप नाही, असं म्हणत अनिल परब यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला.
प्रश्न राहिला उद्धवसाहेब, मुख्यमंत्री आहेत कुठे? तर त्यांचे काम सुरु आहे. ते दिसत आहे. विरोधक सध्या काही विषय नाही, केवळ आरोप करायचा म्हणून करीत आहेत, असंही अनिल परब म्हणाले.
राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला
दरम्यान, राज ठाकरे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना, दुष्काळावरुन राज्य सरकारवर हल्ला चढवला होता. 29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामं केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. तसंच आपण दुष्काळ दौऱ्यावर जाणार नाही, दुष्काळ टुरिझम करणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले होते.
संबंधित बातम्या
29 हजार गावात दुष्काळ जाहीर, मग सिंचनाची कामं काय केली? : राज ठाकरे