मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण सात जागांसाठी मतदान झालं. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहीर यांच्यासारख्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी
नागपूरमध्ये 54.74 % मतदान झालंय, 2014 ला 57.12 % मतदान झालं होतं.
चंद्रपूरमध्ये 64.66 % मतदान झालंय, 2014 मध्ये 63.29 % मतदान झालं होतं.
वर्ध्यात 61.18 % मतदानाची नोंद झाली, 2014 मध्ये 64.79 % मतदान झालं होतं.
भंडारा-गोंदियात 68.27% मतदान झालंय, 2014 ची टक्केवारी 72.31 % इतकी होती.
वाशिम-यवतमाळमध्ये 61.09 % मतदान झालंय, 2014 मध्ये 58.87 % मतदान झालं होतं.
गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक 72 % मतदानाची नोंद झाली. 2014 मध्ये 76 % मतदान झालं होतं.
रामटेकमध्ये 52.12 % मतदान झालं, 2014 ची टक्केवारी 62.64 इतकी होती,
तर एकूण सातही मतदारसंघात 63.46 % मतदान झालं.
पहिल्या टप्प्यात कुणाच्या किती सभा?
पहिल्या टप्प्यातील सात जागांचा विचार करता भाजप-शिवसेना युतीचे सहा खासदार आहेत. भंडारा-गोंदियाची जागा भाजपने पोटनिवडणुकीत गमावली होती. त्यामुळे जागा राखण्यासाठी युतीकडून पहिल्या टप्प्यातला प्रचारही जोरात झाला. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 20 सभा झाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तीन आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या तीन सभा झाल्या.
काँग्रेसला बालेकिल्ला परत मिळवता येणार?
विदर्भ हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 च्या मोदी लाटेत सर्व विक्रम मोडीत निघाले आणि काँग्रेसला विदर्भात खातंही उघडता आलं नव्हतं. 2014 ला मोदी लाट होती. त्यामुळेच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि भाजपला फायदा झाला. युतीने विदर्भातील सर्व जागा जिंकल्या. पण यावेळी तसं वातावरण नाही. यावेळी 50-50 लढत होते, की 70-30 अशी लढत होते हे सांगणं कठिण आहे. भाजपसाठी हा सामना सोपा नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढत पाहिली तर नागपुरातून नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले, चंद्रपूरमधून केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर, तर वाशिम-यवतमाळमधून शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरेंकडे नजरा आहेत. आता युतीचा दबदबा राहिल की आघाडी मुसंडी मारणार हे 23 तारखेला कळणार आहे.
VIDEO : 48 जागांचा लेखाजोखा