मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे मावळ. पवार कुटुंबातील तिसरी पिढी पार्थ पवार यांच्या रुपाने या निवडणुकीत आहे. त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मावळमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला किती यश येतंय हे येत्या 23 मे रोजी कळणार आहे.
चौथ्या टप्प्यात देशातील नऊ राज्यांमधील 71 जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात ज्या 17 जागांसाठी मतदान होतंय, त्या सर्वच्या सर्व जागा सध्या शिवसेना आणि भाजपकडे आहेत. राज्यातील 17 मतदारसंघांसाठी 33314 केंद्रांवर मतदान होईल. 17 जागांसाठी एकूण 31192823 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
17 जागांवर शिवसेना-भाजपचा खासदार
चौथ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीतील सर्वच्या सर्व जागा 2014 ला शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा राखण्याचं आव्हान युतीसमोर असेल. तर मुंबईत सहा जागा आहेत. त्यामुळे मुंबईत यावेळी खातं उघडण्यासाठी काँग्रेस नशिब आजमवणार आहे. मुंबईतील सहापैकी सहा जागा शिवसेना-भाजपने जिंकल्या होत्या.
मावळमधील लढतीकडे लक्ष
मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून श्रीरंग बारणे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पार्थ पवार हे उमेदवार आहेत. पवार कुटुंबातील व्यक्तीसाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मावळमध्ये प्रचार केला. विशेष म्हणजे पार्थ यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
कोणकोणत्या मतदारसंघात निवडणूक?
29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.
मतदारसंघ आणि विद्यमान खासदार
नंदुरबार : हिना गावित, भाजप
धुळे : डॉ. सुभाष भामरे, भाजप
नाशिक : हेमंत गोडसे, शिवसेना
पालघर : राजेंद्र गावित, भाजप (पोटनिवडणुकीत विजयी)
भिवंडी : कपिल पाटील, भाजप
कल्याण : श्रीकांत शिंदे, शिवसेना
ठाणे : राजन विचारे, शिवसेना
मावळ : श्रीरंग बारणे, शिवसेना
शिरुर : शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना
शिर्डी : सदाशिव लोखंडे, शिवसेना
मुंबई उत्तर : गोपाल शेट्टी, भाजप
मुंबई उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर, शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व : किरीट सोमय्या, भाजप
मुंबई उत्तर मध्य : पूनम महाजन, भाजप
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे, शिवसेना
मुंबई दक्षिण : अरविंद सावंत, शिवसेना