सरपंचांच्या मानधनात भरघोस वाढ, उपसरपंचांनाही मानधन मिळणार

| Updated on: Jul 31, 2019 | 10:38 AM

राज्य सरकारने सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही आता उपसरपंचांनाही लाभ मिळणार आहे.

सरपंचांच्या मानधनात भरघोस वाढ, उपसरपंचांनाही मानधन मिळणार
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने सरपंचांच्या मानधनात (Sarpanch honorarium ) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही आता उपसरपंचांनाही लाभ मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला तीन हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. शिवाय उपसरपंचांना आता लोकसंख्येनुसार 1 हजार ते 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 27 हजार 854 सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा 1 जुलै 2019 पासून लाभ मिळणार आहे.

दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी सरपंचाचे मानधन एक हजाराऐवजी तीन हजार, 2001 ते 8 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी 1500 ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन हजार ऐवजी पाच हजार रूपये असे मानधन वाढविण्यात आले आहे.

उपसरपंचांचे मानधन अशाच पद्धतीने लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक हजार, पंधराशे आणि दोन हजार दरमहा देण्यात येणार आहे.