संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार, सहा तारखेचा मुहूर्त लांबणीवर?

| Updated on: Nov 04, 2019 | 10:15 AM

शपथविधी सहा तारखेला होणार असल्याची चर्चा असतानाच आता हा मुहूर्तही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार, सहा तारखेचा मुहूर्त लांबणीवर?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार आहे. शपथविधी सहा तारखेला होणार असल्याची चर्चा असतानाच आता हा मुहूर्तही पुढे (Maharashtra Government Oath Ceremony Date) ढकलला जाण्याची शक्यता आहे.

शपथविधी पुढे ढकलण्याबाबत भाजपच्या गोटात चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सत्तास्थापना लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बारा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याचं निमित्त असलं तरी सत्तास्थापनेच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचं खातेवाटप, शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला आणि उपमुख्यमंत्रिपद यासारख्या अनेक विषयांवर दोघांची चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रपती राजवट लागू करायला काय तो चिवडा आहे का? : संजय राऊत

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊतही आपल्याकडे बहुमत पार करण्याचा आकडा असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? याचा सस्पेन्स कायम आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Maharashtra Government Oath Ceremony Date