मुंबई : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी ( Governor Announces Financial Relief to Farmers) आर्थिक मदत जाहीर केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचं नुकसान ( Governor Announces Financial Relief to Farmers) झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी 18 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचितसह दिलासा दिला आहे.
कृषी खरीप पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 8,000 रुपये, आणि फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर 18 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, हेक्टरी 8 हजार म्हणजे एकरी 3 हजार ते 3200 रुपयेच मदत मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
ही शेतकऱ्यांची चेष्टा
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर टीकास्त्र सोडलं. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे. तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे. ही सर्व चेष्टा सुरु आहे. राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहीत नाही. आपली काळी टोपी घालून नुसतं राजभवनात बसतात. खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावं, शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घ्याव्यात आणि ही तुटपुंजी मदत जाहीर करताना दहा वेळा विचार करावा, असं राजू शेट्टी म्हणाले.
आमचं दुर्दैव आहे की अशाप्रकारचे राज्यकर्ते आमच्या नशिबी आले आहेत. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढत आहे. हा निधी तुटपुंजी आहे. राज्यातील 70 लाख शेतकरी बाधित आहेत. माझा आकाडा यापेक्षा जास्त आहे. एवढ्या 10 हजार कोटींनी काय होणार आहे.
हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी
कोणतीही अट, निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयाची ताबडतोब मदत द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.