मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता आपला मोर्चा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. ठाकरे सरकारने तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची बदली म्हणजे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी (Ashwini Joshi, BMC transferred) यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अधिकाऱ्यांच्या बदलीला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. (Ashwini Joshi, BMC transferred)
अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर अश्विनी जोशींच्या जागी एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सहआयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांच्याविरोधात अविश्वास आणण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा होता. ‘आपली चिकीत्सा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा शिवसेनेचा दावा होता. या योजनेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी शिवसेनेनं लावून धरली होती. पण जोशी यांनी ठेकेदाराला एक संधी देण्याची भूमिका घेतली होती.
अश्विनी जोशी यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य, घनकचरा विभागाची जबाबदारी होती. अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महापालिका मुख्यलयात समन्वय समित्यांची एकत्रित बैठक घेऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तोपर्यंत जोशी यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर महापालिकेत जोशी यांच्या पदावर एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मुंबई महापालिकेतील अनेक प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आहेत. अश्विनी जोशी यांच्या तडकाफडकी बदलीतून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मालिका सुरु झाली आहे.