मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा सादर केला. ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात असून सव्वा महिन्याच्या कालावधीतच दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी एका युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडकलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. (Maharashtra Home Minister Anil Deshmukh Resign Two Ministers Sanjay Rathod resigned in a month)
अनिल देशमुख यांचा राजीनामा
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक म्हणाले.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रिपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहेत. नव्या गृहमंत्र्यांबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन राजीनाम्याची प्रत सादर केली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी मुंबई हायकोर्टात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे. (Anil Deshmukh Sanjay Rathod resigned )
संजय राठोड यांचा राजीनामा
शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पुण्यात झालेल्या बीडमधील युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विरोधीपक्षाने अधिवेशन चालू द्यावे, यासाठी संजय राठोड यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राजीनामा दिला होता.
संबंधित बातम्या :
अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!
…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया
(Maharashtra Home Minister Anil Deshmukh Resign Two Ministers Sanjay Rathod resigned in a month)