मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Rainy session) लांबणीवर पडलंय. 18 जुलैपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार होतं. पण अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. विधिमंडळ सचिवालयाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Election 2022) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी विधिमंडळात मतदार पार पडले, असंही विधिमंडळ सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, सध्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणं बाकी आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, मुख्य प्रतोद, राज्यपालांची भूमिका, अशा एकमेकांशी संबंधित असलेल्या राजकीय (Maharashtra Political Crisis) गुंतागुंतीचा पेच न्यायप्रविष्ट आहे. त्यातच अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पावसाळी अधिवेशनही पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, आता लांबलेलं अधिवेशन नेमकं कधी होणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अद्याप याबाबतची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. संसदीय कार्य विभागाकडून पुढील तारीख जाहीर झाल्यानंतर अधिवेशनाबाबत पुढील वेळापत्रक जारी केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची दिली.
18 जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकललं जाईल, अशी शक्यता होतीच. पुढे ढकलेलं अधिवेशन 19 किंवा 20 जुलैपासून घेण्यात येईलष अशी शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. दरम्यान आता नेमकं पुढे ढकलण्यात आलेलं अधिवेशन केव्हा होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अधिवेशन पुढे ढकललं का, असा प्रश्नही यानिमित्त राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. अनिश्चित काळासाठी पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून, आता अधिवेशन केव्हा सुरु होतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.