मुंबई : सर्वत्र सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी 29 एप्रिलला राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष, तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 332 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. मतदानावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्रातील 7 जागांवर उद्या मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वत्र कडकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.
या लोकसभा मतदारसंघामध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रात सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू), तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आली आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यात 31 मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं आहे. त्यानुसार राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे. तसेच ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वीच्या टप्प्यातील मतदानासाठी पुरवण्यात आल्या आहेत.
दरम्यान उद्या नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :
मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाला भर पगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देणे बंधनकारक असणार आहे.