मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीचे (MLC Election) वारेही आता वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून (Shivsena) दोन आणि काँग्रेसकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीकडूनही दोन उमेदवारांची नावं जाहीर होतील. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.
विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. तर एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. यासह एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सध्याच्या राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी होतील. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसला अजून एका जागेसाठी म्हणजेच 10 व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 10 व्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.
आता प्रश्न उरतो तो 10 व्या जागेचा. कारण सर्व राजकीय पक्षांचं संख्याबळ पाहिलं तर 9 जागांचा निकाल सहजपणे लागू शकतो. तर 10 व्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. विधान परिषदेत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 आमदारांची मतं मिळणं गरज आहे. भाजप आणि अपक्ष मिळून भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. महाविकालस आघाडीकडे एकूण 169 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजरित्या निवडून येऊ शकतो. पण काँग्रेसनं 10 व्या जागेसाठी उमेदवार दिलाय. त्यामुळे या 10 व्या जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळू शकतं.
भाजपकडून विधान परिषदेसाठी विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील दरेकर, लाड, भारतीय आणि शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. तर उमा खापरे यांचा अर्ज उद्या सकाळी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात मोठा वाटा असलेले सचिन अहिर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. तर आदिवासी नेते आमशा पाडवी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दोन नावांची घोषणा करण्यात आलीय. त्यात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचीही उमेदवार काँग्रेसकडून घोषित केली आहे.
प्रवीण दरेकर
सुजितसिंह ठाकूर
प्रसाद लाड
सदाभाऊ खोत
विनायक मेटे
रामराजे निंबाळकर
संजय दौंड
सुभाष देसाई
दिवाकर रावते