मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग देखील बदलण्यात येणार असल्याचे (MNS Party Flag change) बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत सूर न गवसलेल्या राज ठाकरे यांनी आता संस्थात्मक पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संघटनेतील प्रतिकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला (MNS Party Flag change) आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. या नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार आहे. विशेष म्हणजे झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. याच दिवशी या झेंड्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग बदलून राज ठाकरे यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार (MNS Party Flag change) आहे.
दरम्यान, नवा झेंडा जो समोर (भगव्या रंगावर राजमुद्रा) येत आहे तोही मनसेचाच यापूर्वी वापरातील झेंडा आहे. चार वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी हा झेंडा पक्षात सादर केला होता. शिवजयंती आणि महाराष्ट्र् दिन यादिवशी हा झेंडा पक्षात वापरला जातो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला राज ठाकरे यांनी पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. ‘या महाअधिवेशनापासून तुम्हाला नव्या स्वरुपातील राज ठाकरे पाहायला मिळतील, अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेचे संकेत दिले आहेत.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेचा दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवण्यासाठी ही रणनीती बनत असल्याचं बोललं जात आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना ‘आपला शत्रू कोण?’ असा थेट सवाल केल्याचंही बोललं जात आहे. एकेकाळी मनसेने नरेंद्र मोदी आणि भाजपची स्तुती केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला विरोध केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या भाजपविरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेबरोबर सत्ता स्थापन केली. मनसेला काहीच फायदा झाला नाही. आगामी काळात महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करावं, अशीही आग्रही मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्याचाही माहिती मिळत (MNS Party Flag change) आहे.