मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं (Raj thackeray mns morcha) होतं. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून ते आझाद मैदान या मार्गावर मनसेचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मुंबईत दाखल झाले.
या मोर्चासाठी राज ठाकरे हे दुपारी 12 वाजता दाखल होतील असं सांगण्यात येत होतं. तर काही जण ते दुपारी 2 पर्यंत येतील असे सांगत होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चात चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्या वेळाने ते गाडीत बसून आझाद मैदानात निघून गेले. यानंतर राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. त्यावेळी त्यांनी मी मोर्चासाठी उशिरा का आलो याचे कारणही सांगितले.
“आज तुम्ही जी काही ताकद दाखवली आहे त्याबद्दल मी शतश: ऋणी राहिन मी मोर्चाला उत्तर मोर्चाने असेन असं सांगितलं होतं. आज तुम्ही सर्वांनी ज्यांनी मोर्चे काढले होते. त्यांना सर्वांना चोख उत्तर दिलं. काल कोणीतरी पसरवलं होतं की मी 11 वाजून 55 मिनिटांनी येणार आहे. मला कोणीतरी विचारलं तुम्ही 11 वाजून 55 मिनिटांनी येणार का? तेव्हा मी त्याला म्हटलं अरे ट्रेन आहे का मी? मोर्चा आहे गाड्या यायला वेळ लागतो. लोकं यायला वेळ लागतात,” असे राज ठाकरे (Raj thackeray mns morcha) म्हणाले.
“पण आज तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे हजर झालात. त्यानिमित्ताने आज माझ्यासमोर महाराष्ट्राचे दर्शनही झाले,” असेही राज ठाकरे म्हणाले
तसेच राज ठाकरेंनी भाषणादरम्यान पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना इशाराही दिला. “ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असे राज ठाकरे म्हणाले.
“काही हिंदू आहेत, किंवा इतर आपल्या राज्यातील आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते येथीलच आहे. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना 48 तास द्या, ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील,” असेही राज ठाकरे यावेळी (Raj thackeray mns morcha) म्हणाले