मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार यांनी शिंदे गट आणि भाजपशी हातमिळवणी केली आहे. तसेच अजित पवार सरकारमध्ये सामीलही झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. युतीत आता आणखी एक स्ट्राँग भिडू आल्याने भाजपचं पारडं जड झालं आहे. मात्र, अजित पवार युतीत आल्याने दुसरीकडे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आता शिंदे गटात जोरबैठका सुरू झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही लागोपाठ दोन दिवस मध्यरात्री चर्चा झाली आहे. अजित पवार यांना वगळून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री 11.15 वाजता वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मध्यरात्री 1.15 वाजता वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. तब्बल दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. आमदारांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तार, अजितदादांना द्यावयाचं अर्थ खातं आणि त्याबाबत आमदारांची असलेली नाराजी, अजित पवार यांनी विधानसभेच्या 90 जागा लढण्याची जाहीरपणे केलेली घोषणा आदी मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्याशिवाय ही चर्चा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांना डावलून शिंदे-फडणवीस यांनी चर्चा केल्याने या चर्चेचे राजकी अर्थ काढले जात आहेत. त्याआधी गुरुवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नंदनवन बंगल्यावर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर लगेचच काल या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केल्याने काही तरी राजकीय घडामोड घडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्रीही सहभागी होणार आहे. यावेळी तिघांचीही भाषणे होणार आहेत. अजित पवार महायुतीत आल्यानंतरचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे. तसेच विदर्भातीलही हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे हे तिन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यावेळी गडचिरोलीत आज मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाचं लोकार्पण करण्यात येणरा आहे. सरकारी जाहिरातीत पहिल्यांदाच शिंदे आणि फडणवीसांसोबत अजितदादांचे फोटोही लागले आहेत. गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातून अजित पवार यांच्या शासकीय कार्यक्रमाची सुरुवात होत आहे.