अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कार्यकर्त्यासाठी भर पावसात भाषण केलं. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या उपसरपंचांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात लंके यांनी भाषण केलं. भर पावसात भाषण केल्यानंतर उपसरपंचांनी केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. पावसात लंकेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
“कोण म्हणतं सचिनचा पंचायत समितीसाठी विचार करा, कोण म्हणतं निवडणुकीसाठी करा. धुळ्यामध्ये… इथून पाचशे-सहाशे किलोमीटर असले, गावात रात्री बारा वाजता सभा केली मागच्या महिन्यात. बारा वाजताही पाच-सहाशे लोक उपस्थित होते. पाऊस चालू होता, शेवटची सभा, सव्वाबारा वाजता माझं भाषण संपलं, इथे तर आपला तालुका आहे. मी त्यांना सुद्धा म्हटलं, मला असं वाटलं होतं की माझ्याच मतदारसंघातले लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात. पण तुम्ही सुद्धा निस्वार्थी प्रेम करता, यावरुन कळतं कार्यकर्ते किती जिवाला जीव देऊन काम करतात” असं निलेश लंके म्हणत होते.
“मी आमदार झालो, कोणाच्या भरोशावर, कोणाच्या जीवावर.. तुमच्या ना, मला खात्री होती की आता तुम्ही माझ्या जिवाला जीव देणारी माणसं आहे. पण आता तुम्ही ज्याच्या वाढदिवसासाठी आले, त्याच्यासाठी किती निस्वार्थी भावनेने प्रेम करता, हे पाहण्याची वेळ आली आहे. कार्यकर्ते किती प्रेम करतात, हे यावरुन कळतं. बरेच जण असतात हवा भरणारे, तुम लढो, हम कपडे संभालते है, असं म्हणणारे बरेच जण असतात, आखाड्यात सोडून दिला की माज मोडला का नाही म्हणतात, निसर्गाला सुद्धा सचिनची काळजी आहे, म्हणून तो चेक करतोय हे खरं प्रेम करतात की नाही” अशी तुफान फटकेबाजी लंकेंनी केली
पाहा व्हिडीओ :
जयंत पाटलांकडून लंकेंचं कौतुक
दुसरीकडे, अहमदनगरला पारनेर तालुक्यातील सूप येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रात्री साडे अकरा वाजता पूल आणि रस्त्याचं उद्घाटन पार पडलं. यावेळी जयंत पाटलांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. तर पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून झालेल्या वादावर देखील भाष्य करत त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
निलेश लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत आहेत, मात्र गेल्या काही दिवसात कोणीतरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह तयार करण्याचं काम जाणीवपूर्वक करत आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. तसेच या गोष्टी राजकारणात होत असतात. तर काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय असते, मात्र प्रत्येकाने मर्यादित राहून काम करायचं असत असा सल्ला त्यांनी दिला.
मी एवढीच अपेक्षा करेन की निलेश लंके यांच्यासारखे नेते लोकांत राहून काम करतात, लोकांशी ऋणानुबंध असणाऱ्या नेतृवाला अश्या छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे फार काही त्रास होईल, असं वाटत नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
त्याचबरोबर, जे चूक आहे ते चूकच आहे त्याचं मी समर्थन करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. मात्र प्रत्येकाच्या मर्यादा लोकशाहीत ठरलेल्या आहेत. जशा विधानसभेच्या सदस्याच्या ठरल्या आहेत, तश्या अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरल्या आहेत. हा गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर मर्यादेत राहूनच काम झालं पाहिजे, असा सल्लाच त्यांनी दिलाय. तर या संबंधात थोडा त्रास होतोय याची आम्हाला जाणीव आहे मात्र योग्य वेळी योग्य निर्णय होईल असा मला विश्वास आहे असं वक्तव्य करत सूचक इशाराच जयंत पाटलांनी दिला.
संबंधित बातम्या :
पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?