Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेनेच्या संपर्कात नेमके किती आमदार? राऊतांनी सांगितलेला आकडा चिंताजनक!

| Updated on: Jun 23, 2022 | 11:08 AM

उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या आमदारांनी पुन्हा निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.

Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेनेच्या संपर्कात नेमके किती आमदार? राऊतांनी सांगितलेला आकडा चिंताजनक!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भावनिक आवाहानानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटातील आमदारांचं जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेतली (Maharashtra Shivsena) ही उभी फूड पक्षाच्या सरकारमधील अस्तित्वच संपवून टाकते की काय अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनीच बुधवारी सकाळी शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या आमदारांचा आकडा सांगितला. त्यामुळे शिवसेनेची स्थिती चिंताजनक वाटतेय. शिवसेनेच्या संपर्कात 20 आमदार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी आज केलं. तरीही फ्लोअर टेस्ट होईल, तेव्हा आमचं संख्याबळ निश्चित वाढेल. कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह आहे, तेव्हाच ठरेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मात्र राऊतांनी सध्या सांगितलेला आकडा विचारात घेतला असता एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पारडं चांगलंच जड झालंय असं दिसून येतंय. कारण आज सकाळपर्यंत शिंदेगटाकडे 41 आमदार असल्याचं दिसून येतंय..

शिंदेंच्या बंडानंतर आघाडीची अवस्था

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे आतापर्यंत 41 आमदार पोहोचल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यात 6 अपक्षांचाही पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना बाहेर पडल्यास महाविकास आघाडीची अवस्था पुढीलप्रमाणे-

  • शिवसेना – 14 (राऊत म्हणतात- 20)
  • राष्ट्रवादी – 53
  • काँग्रेस – 44
  • अपक्ष – 10
  • एकूण – 121

शिंदे गट मजबूत स्थितीत

  • एकनाथ शिंदे – 47
  • भाजप – 106
  • अपक्ष – 13
  • एकूण – 166

आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं…

दरम्यान, उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या आमदारांनी पुन्हा निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. भाजपशासित राज्यांमध्ये या आमदारांना डांबून ठेवण्यात आलंय, असाही भाजपवर थेट आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजपाच्या पाठिंब्याशिवाय हे कारस्थान शक्य नाही, असं ते म्हणाले.

दोन आमदार सांगणार आपबिती..

दरम्यान, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख आणि उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. सूरतमधून एकनाथ शिंदे गटातून जीवावर बेतणारा प्रसंग झेलण्याचे अनुभव ते आज कथन करणार आहेत. त्यानंतर शिंदेंच्या गटातील आमदार दबावाखाली आहेत का स्वच्छेने गेलेत, हे तुम्ही ठरवावं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना…

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. १७-१८ आमदार सोडून गेले, हे आमदार म्हणजे शिवसेना नव्हे तर रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना होती. आमदार गेले म्हणजे पक्ष संपला नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. तुफानाचा सामना करण्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले शिवसैनिक आहोत, केवळ भक्त म्हणून होत नाही. कुणाच्या दबावाला घाबरणार नाहीत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.