मुंबईः महाराष्ट्रातील शिवसेनेत उभी फूट पाडून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे (Eknath Shibde) गट मुंबईत आला आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी जात आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून बंडखोर आमदार शिवसेनेपासून दूर जाऊन बसले होते. काही दिवस नॉटरिचेबल झालयानंतर शिंदेगटाकडून वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली गेली. शिवसेना सोडण्याचा आमचा हेतू कधीच नाही आणि भविष्यातही आम्ही शिवसेना, भगवा सोडणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा आम्ही कधीही करणार नाहीत, मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांच्या भावना समजून घ्याव्यात, असं म्हणत सातत्यानं प्रमुख पाच मागण्या मांडल्या गेल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना यांच्यातील दरी वाढत गेली. हा ताण का वाढत गेला, याची कारणं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज सांगितली. आम्ही सांगितलेली भूमिका न ऐकल्यामुळे आम्हाला हा संघर्ष करावा लागला. आपल्या मूळ मित्रपक्षासोबत आपल्याला मत लोकांनी दिलं होतं. त्यांच्यासोबत राहावं, अशी आमची भूमिका होती, पण मुख्य भूमिका सोडून इतर मार्ग अवलंबायला सुरुवात केली. भावनिक आवाहन केलं, राऊतांकडून धमक्या दिल्या गेल्या. गद्दार म्हणलं, इतर बातम्या पसरवल्या गेल्या. यामुळेच हा संघर्ष आज इथपर्यंत येऊन थांबला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आम्ही जल्लोष केला, ही खोटी बातमीही पसरवली गेली. पण आमच्यासाठी ही अत्यंत खेदजनक घटना आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली. आजही ते प्रमुख पाच तक्रारींवर ठाम होते.
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून वारंवार भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आम्ही एकत्र आलो आहोत, असे म्हटले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल्याने शिवसेना हिंदुत्वापासून खूप दूर निघून गेली असून आधी या पक्षांशी सत्तेतील आघाडी सोडून बाहेर पडा, अशी मागणी शिंदेगटाने केलेली आहे. आजही त्यांची हीच तक्रार आहे. आजही, केसरकर म्हणाले, उद्धव साहेबांच्या विरोधात गेलं, त्याच्याविरोधात बंडखोरी केली, असं कुणी नाही केलेलं.. आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात बंड केलंय..
40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांचं ऐकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांचं ऐकून फुटलेल्या शिवसैनिकांनाच धमक्या देण्यात आल्या. महाविकास आघाडी सोडून भाजपशी हातमिळवणी करण्याची विनंती शिंदेगटाकडून वारंवार करण्यात आली. मात्र उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत आघाडीतील लोकांवरच विश्वास असल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेत, तरीही त्यांनी भाजपशी युती केली नाही. शिंदेगटाच्या मनात अजूनही ही सल आहे.
शिवसेना फोडून निघालेल्या सर्व शिवसैनिकांनी संजय राऊतांवर वारंवार आरोप केलेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. गुवाहटीत गेलेल्या शिवसैनिक आमदारांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जातायत. तुमची प्रेतं इथे येतील, अशी भाषा वापरली जातेय, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांवर कारवाई का नाही करत, ही खंत अजूनही बंडखोरांना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पडल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उमेदवारांना पाडलं, अशी त्यांची तक्रार आहे. आज गुरुवारीही केसरकर म्हणाले, ‘शिवसेना संपवण्याचं काम जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस करत असेल, तर ते कसं चालेल.. आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु होती… या सगळ्याचा एवढा उशीर झाला.. राज्यसभेची निवडणूक झाली.. राष्ट्रवादीच्या माणसांनी आम्हाला मतदान केलं नाही…हे राऊतसाहेब पीसीत बोलले होते..’
मुख्यमंत्र्यांचा थेट लोकप्रतिनिधींशी संपर्क नाही, ही तक्रार शिंदेगटानं वारंवार केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊन शिवसैनिक आमदारांकडे, त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. निधी पुरवण्यात आला नाही, अशी आमदारांची तक्रार आहे. आजही उद्धव ठाकरे यांनी आमच्या मागण्या आणि भूमिका मोठ्या मनाने स्वीकाराव्यात आम्ही तुमच्यासमोर येण्यास तयार आहोत, अशी भूमिका केसरकर यांनी मांडली.