मुंबई : 24 जूनला मुंबईत वरूणराजाचं आगमन झालं. ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पाऊस होतोय. काही ठिकाणी धबधबे वाहते झाल्याचंही पाहायला मिळत आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम देखील ओव्हरफ्लो झाला आहे.ठाण्यातही पाऊस झालाय. तर तिकडं नाशिकमध्ये मागच्या 24 तासात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट देणारे हे व्हीडिओ पाहाच…
लोणावळा -खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. वर्षापर्टनासाठी पर्यटक लोणावळ्याला भेट देतात. लोणावळ्यातील पर्यटकांचा आवडता भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक भुशी डॅम परिसरात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.
नाशिक शहर आणि परिसरात सलग दोन दिवस पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मागच्या 24 तासात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात आठ ते दहा टक्के आणि गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात दोन ते तीन टक्के वाढ झाली आहे. सद्यस्थितीत दारणा धरणात 26.56 टक्के, तर गंगापूर धरणात 30 टक्के पाणीसाठा आहे.
आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाची संततधार सुरु आहे. काल दिवसभरात ठाण्यात 33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे शहरात कोसळणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आज दुपारून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
वसई-विरार, नालासोपारा परिसरात जोरदार पाऊस बरसतोय. पूर्ण रात्र रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडला. पावसाची संततधार सुरू असतानाही शहरात सध्या मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचलेले नाही. सकाळच्या वेळेत विरार ते चर्चगेट लोकल ही सुरळीतपणे सुरू आहेत. वसई-विरार परिसरात आभाळ पूर्णता भरून आलं असल्यानं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस होतोय. अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण पश्चिम रामबाग परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. रिक्षा आणि वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत वाहनं चालवावी लागत आहेत. पावसाचा जोर असाच असला तर अवघ्या काही तासात परिसरामधील लोकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.