नागपूर : कॅबिनेट मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिणारे काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या प्रयत्नाने देशमुख यांना प्रमोशन मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागपुरातील काँग्रेसची गटबाजी कायम असल्याचं दिसत आहे. अतुल लोंढे यांचं प्रवक्तेपद कायम आहे, तर आमदार अभिजीत वंजारी यांनाही महासचिवपद देण्यात आले आहे.
कोण आहेत आशिष देशमुख?
आशिष देशमुख हे 2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आशिष देशमुखांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.
पृथ्वीराजबाबा शिस्तपालन समितीचे अध्यक्ष
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्याचं शिस्तपालन कमिटीची धुरा सोपवण्यात आली आहे.
कोणाकोणाची वर्णी
काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे. आशिष देशमुख आणि धीरज देशमुख यांना जनरल सेक्रेटरी (महासचिव) पदाची जबाबदारी दिली गेलीय. त्याचबरोबर शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश पाटीलही जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळतील. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडेही जनरल सेक्रेटरी पद देण्यात आलंय. तर सचिन गुंजाळ हे सचिवपदी असतील.
नव्या कार्यकारिणीत जातींचा समतोल
महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातींच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे. हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे.
पहिल्यांदाच 2 तृतियपंथीयांना स्थान
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकरणीत पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आलं आहे. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसून येत आहे.
संबंधित बातम्या :
आमच्या पक्षातील ‘या’ नेत्याला मंत्रिमंडळातून काढा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी
महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नीला उपाध्यक्षपद