परिणय फुकेंच्या स्वागतासाठी आलेल्या कार्य़कर्त्यांकडून नागपूर विमानतळाचं नुकसान

| Updated on: Jun 23, 2019 | 6:21 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि नवनियुक्त राज्यमंत्री परिणय फुके यांचे आज नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले.

परिणय फुकेंच्या स्वागतासाठी आलेल्या कार्य़कर्त्यांकडून नागपूर विमानतळाचं नुकसान
Follow us on

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि नवनियुक्त राज्यमंत्री परिणय फुके यांचे आज नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके हे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले. नागपूर विमानतळावर आमदार परिणय फुके यांचं कार्यर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मंत्र्यांच्या जंगी स्वागतात कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात विमानतळावरील रेलिंग्सचं नुकसान केलं. इतकंच नाही तर स्वत: परिणय फुकेंनाही त्यांचा उत्साह आवरता आला नाही आणि तेही एका सरकारी गाडीवर उभे झाले.

नागपूर विमानतळाला भाजप नेता आणि कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा परिणाम भोगावा लागला. परिणय फुके यांच्या स्वागतासाठी हजारो भाजप कार्यकर्ते आणि परिणय फुकेंच्या समर्थकांनी विमानतळावर गर्दी केली. विमानतळाच्या बाहेर येताच इतकी गर्दी पाहून फुकेंनाही त्यांचा आनंद आवरता आला नाही आणि समर्थकांचं अभिवादन करण्यासाठी फुके थेट सरकारच्या वन विभागाच्या गाडीवर चढले. त्यानंतर फुकेंनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं, तसेच कार्यकर्त्यांकडून फुलांचे हारही स्वीकारले.

आपल्या मंत्र्याला असं समोर पाहून कार्यकर्त्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु लागले. याप्रयत्नात काही कार्यकर्ते विमानतळावरील लोखंडाच्या रेलिंग्सवर चढले. कार्यकर्त्यांचं वजन सहन न झाल्याने विमानतळावरील तीन रेलिंग्स तुटल्या आणि  कार्यकर्ते खाली पडले. तर दुसरीकडे, परिणय फुकेंच्या वजनाने सरकारी कारच्या छताचेही नुकसान झाले. जेव्हा परिणय फुके हे गाडीवरुन खाली उतरले तेव्हा गाडीच्या छताचा पत्रा चेपला गेलेला होता. त्यानंतर तिथे उपस्थित मीडिया प्रतिनिधींनी  गाडीच्या छताचे फोटो काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ ती गाडी तेथून रवाना केली.

परिणय फुकेंच्या स्वागतासाठी भाजपसोबतच इतर पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, फुके हे ओबीसी महासंघाचे नेते असल्याने इतर पक्षातील ओबीसी नेते म्हणून आले होत, अंस सांगण्यात आलं. परिणय फुके यांना तीन महिन्यांसाठी वन आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

VIDEO :