सातारा : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मात्र पुणे पदवीधर अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे मतदान यादीतून गायब झालं आहे. यामुळे अभिजीत बिचुकले यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra Teacher and Graduate Constituency Candidate Abhijeet Bichukale Name Disappeared from the voting list)
पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे नाव मतदान यादीतून गायब झालं आहे. सकाळी ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यावेळी मतदार यादीत त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. मात्र त्यांच्या नावाखाली अभिजीत बिचुकलेंचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते.
यानंतर अभिजीत बिचुकले यांनी मतदान यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथवर गोंधळ घातला आहे. या सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजपवर फोडले आहे.
“मामा माझं या यादीत नाव नाही. उमेदवाराचं नाव नाही, तर सर्वसामान्यांचं काय. कोणीही येऊन XYZ तिथे येऊन मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केलं नाही. यांनी स्वत:ची नावं लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचं नाव आहे. पण माझं नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला निवडणुकीपासून वंचित राहावं लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे,” अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे.
“पण निवडणूक आयोग अशाप्रकारे भोंगळ कारभार करत असेल, तर अवघड आहे. यंत्रणा या याद्या पुरवत होते, किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या याद्या करत होते, निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवाराचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही का? कोणता पक्ष आहे, हे यात शोधलं पाहिजे. भाजपने या याद्या बनवल्या आहेत,” असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. (Maharashtra Teacher and Graduate Constituency Candidate Abhijeet Bichukale Name Disappeared from the voting list)