उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांना जीवनदान मिळालं आहे. कारण महापौर निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी भाजपने या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिका कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगर महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत टीम ओमी कलानीचे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. या नगरसेवकांनी पहिली अडीच वर्ष भाजपला समर्थन दिलं, तर अडीच वर्षांनी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत यापैकी 9 नगरसेवकांनी भाजपचा व्हीप झुगारत शिवसेनेला मतदान केलं, ज्यामुळे उल्हासनगर महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर झाल्या.
कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजपची याचिका
यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी याचिका कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत कोकण विभागीय आयुक्तांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे कलानी समर्थक 9 नगरसेवकांना जीवनदान मिळालं आहे.
कोण आहेत 9 नगरसेविका
पप्पू कलानी यांची सून आणि उल्हासनगरच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांच्यासह डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगिनी निकम, छाया चक्रवर्ती, रेखा ठाकूर, आशा बिऱ्हाडे, कविता गायकवाड आणि जयश्री पाटील अशी या 9 नगरसेविकांची नावं आहेत. या नगरसेविकांना जीवनदान मिळाल्यानंतर शुक्रवारी पप्पू कलानी यांचं निवासस्थान असलेल्या ‘कलानी महल’वर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत
दरम्यान, याच नगरसेविकांच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर पंचम कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सोपवत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उर्वरित 8 नगरसेविकांनी पक्षांतर बंदी कायद्यामुळे अजूनही राष्ट्रवादीत थेट प्रवेश केलेला नाही. मात्र अपात्रतेची कारवाई टळल्यामुळे भविष्यात हे नगरसेवक राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकणार असून त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद मात्र वाढली आहे.
संबंधित बातम्या :
उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’
राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की
उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल