मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर काँग्रेसनं घेतलेला आरोप राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगानेही (Election Commission) फेटाळून लावलाय. त्यानंतर दोन तास उशिराने विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) मतमोजणीला सुरुवाकत झालीय. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. मात्र, 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळतेय. अशावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार सेफ असल्याचं बोललं जातय. तर भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांचा विजयही निश्चित मानला जातोय. अशावेळी खरी लढत ही भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यातच असल्याचं पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दोन्ही उमेदवार सेफ असल्याचं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवारांसाठी 28 मतांचा कोटा निश्चित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकूण 51 मतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्या पसंतीची मतं रामराजे नाईक निंबाळकरांना दिली आहेत. पहिल्या पसंतीची 28 मतं रामराजे नाईक निंबाळकरांना दिल्यानंतर राष्ट्रवादीकडे 23 मतं उरतात. अशा स्थितीत विजयासाठी आवश्यक असलेल्या 26 मतांनंतर 2 मतं ट्रान्सफर होतात. त्यामुळे राष्ट्रवादीकडे खडसे यांच्यासाठी 25 मतं राहतात. अशावेळी खडसेंना विजयासाठी एका मताची गरज उरते. राष्ट्रवादीला काही अपक्षांचाही पाठिंबा असल्यामुळे एकनाथ खडसे यांचा विजय सुकर असल्याचं दिसत आहे.
तर भाजपने आपल्या उमेदवारांसाठी 30, 30, 28 आणि 29 असा कोटा ठरवला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांचा विजय निश्चित मानला जातोय. प्रत्येक उमेदाराला विजयासाठी 26 मतांची गरज आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांची भिस्त ट्रान्सफर मतांवर आणि काही अपक्षांवर असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी भाजप किती अपक्षांना आपल्याकडे ओढण्यात यशस्वी होईल. त्यावरच लाड यांचा विजय सुनिश्चित होईल.
10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात खरी लढत ही भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांच्यात आहे. त्यात सध्या तरी भाई जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र राज्यसभेप्रमाणे भाजपनं काही अपक्षांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं तर लाड यांचा विजय होऊ शकतो.