चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्याकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. मोदी 2.0 च्या रणधुमाळीत राज्यात आणि मध्य भारतात, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून आला तो चंद्रपुरातून. खासदार बाळू धानोरकर यांनी इथे बाजी मारली. अर्थात त्याची कारणे वेगळी आहेत. मात्र एखाद्या विद्यमान केंद्रीय मंत्र्यांचा झालेला पराभव काँग्रेससाठी उत्साह वाढविणारा तर भाजपसाठी धोक्याची घंटा देणारा ठरला आहे. सध्या जिल्ह्याचा विचार केला तर राज्याचे हेवीवेट मंत्री, अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांच्याभोवती जिल्ह्यातील सत्तेचे केंद्र फिरत आहे.
जिल्ह्यात 6 विधानसभा क्षेत्रे आहेत. यातील 4 भाजप , 1 शिवसेना (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर ) आणि काँग्रेस 1 अशी स्थिती आहे. लोकसभेत काँग्रेसने भाजपला धूळ चारली आता विधानसभेच्या मातीचा कोण पैलवान ठरतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा
1) चंद्रपूर विधानसभा (Chandrapur Vidhan Sabha)
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC ) राखीव आहे. हा तसा संपूर्ण शहरी मतदारसंघ आहे. केवळ घुग्गुस हा एक छोटा ग्रामीण भाग यात मोडतो. मात्र हा उद्योगबहुल भाग आहे. सध्या भाजपचे नाना शामकुळे इथून आमदार आहेत. ही शामकुळे यांची दुसरी टर्म आहे. नागपुरातून भाजप नेते नितीन गडकरी यांनी अहिर-मुनगंटीवार यांच्या वादातून थेट शामकुळे यांना तिकीट देऊ केले आणि भाजपच्या भक्कम संघटन बळावर नाना शामकुळे यांनी सहज विजय प्राप्त केला.
सुधीर मुनगंटीवार 3 टर्म या क्षेत्रातून आमदार होते. त्यांची विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क शामकुळे यांना तारुन गेला. विशेष म्हणजे गेले 2 टर्म भाजपच्या या खेळीला छेद देण्यासाठी काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळाला नाही. परिणामी भाजपला जणू वॉकओव्हर मिळाला.
मागील खेपेस स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेने भाजपला तगडे आव्हान दिले होते. मात्र शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्याने भाजपला ही निवडणूक सोपी झाली आहे. काँग्रेस आणि वंचितने दमदार उमेदवारी दिल्यास रखडलेली विकासकामे आणि आमदार नाना शामकुळे यांची पाहुणे म्हणून होणारी चंद्रपूरवारी या मुद्यावर भाजप अडचणीत येऊ शकते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला 25744 मतांची भलीमोठी आघाडी मिळाली आहे हे विशेष.
मागील खेपेस (2014 )या मतदारसंघात मिळालेली मते :-
2) बल्लारपूर विधानसभा (Ballarpur Vidhansabha)
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ आहे. चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर राज्यातील लक्षवेधी मतदारसंघात बल्लारपूरचा समावेश होतो. पूर्णतः ग्रामीण तोंडवळ्याच्या या मतदारसंघात बल्लारपूर पेपर मिल असलेले बल्लारपूर शहर हे एकमेव शहरी केंद्र आहे. राज्यातील दिग्गज भाजप नेते आणि राज्याचे अर्थ-नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.
आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाते. मात्र काँग्रेसने जगाबद्दल करत ही जागा आपल्याकडे घेतली. मात्र तुल्यबळ उमेदवार नसल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा सहज विजय झाला. गेल्या ५ वर्षात अर्थखाते स्वतःकडे असलेल्या मुनगंटीवार यांनी रस्ते-सिंचन-शेती आणि विकासकामांबाबत सूक्ष्म नियोजन केले आणि मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे खेचून आणली. याचा परिणाम म्हणजे मतदारसंघात विरोधक निष्प्रभ आहेत. काँग्रेस अथवा राष्ट्रवादीने जातीय आणि आर्थिक सबळ उमेदवार दिल्यास मुनगंटीवार अडचणीत येऊ शकतात अशी स्थिती आहे.
भाजपचे जिल्ह्याचेच काय विदर्भाचे राजकारण देखील ज्या प्रमुख नावांभोवती फिरते त्यात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असल्याने, त्यांना अडचण निर्माण करणे हे सहज सोपे नाही याची जाणीव विरोधकांना देखील आहेच.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातकाँग्रेसला ३१,०६१ मतांची आश्चर्यकारक आघाडी आहे.
मागील खेपेस (2014 )या मतदारसंघात मिळालेली मते :-
3) ब्रम्हपुरी विधानसभा (Brahmapuri vidhansabha)
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. राज्यात सध्या पक्षांतराचे वादळ आहे. मात्र सुमारे 15 वर्षांपूर्वी शिवसेनेला भगदाड पाडून काँग्रेसवासी झालेले आमदार विजय वडेट्टीवार सध्या काँग्रेसमध्ये पक्षनिष्ठेसाठी ओळखले जात आहेत.
विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण मतदारसंख्या असलेले क्षेत्र आहे. इथला निकाल देखील पूर्वीपासून संमिश्र राहिला आहे. अगदी अपक्ष-जनता दल -भाजप आणि आता काँग्रेस असा संमिश्र कौल इथले वैशिष्ट्य आहे.
चिमूर मतदारसंघ सोडून विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे नशीब आजमाविण्याचे ठरविले. मागील खेपेस या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची जंगी सभा झाली. तरीदेखील विजय वडेट्टीवार यांनी इथून पंजा राखला होता. सध्याही काँग्रेसकडे दमदार उमेदवार आहे. मात्र भाजपला उमेदवार गवसलेला नाही. आदिवासींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी इथून अपक्ष निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. तर भाजप राष्ट्रवादीतून जिल्हाध्यक्ष आयात करणार असल्याच्या वार्ता आहेत.
दुसरीकडे काँगेसच्या अंतर्गत राजकारणात कुरघोडी करण्यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात तिकीट मागितल्याने मोठा राजकीय संघर्ष घडण्याची शक्यता आहे. यात भाजप आपला फायदा शोधत असून सध्या भाजपचे पत्ते क्लोज आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा (मतदारसंघ -गडचिरोली ) निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला १२५१२ मतांची आघाडी आहे.
मागील खेपेस (2014 )या मतदारसंघात मिळालेली मते :-
4) चिमूर विधानसभा (Chimur Vidhansabha)
चंद्रपूर जिल्ह्यात मोडणारा मात्र लोकसभेच्या दृष्टीने गडचिरोली लोकसभेत असलेला चिमूर विधानसभा मतदारसंघ अत्यंत अस्थिर म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील बहुतांश भाग ग्रामीण आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे विकासवाटेवर रेंगाळत असलेला हा मतदारसंघ 2014 साली प्रथमच भाजपच्या झोळीत पडला. याआधी काँगेसचे विजय वडेट्टीवार इथले आमदार होते. त्यांचे घनिष्ट व्यावसायिक मित्र बंटी भांगडिया यांच्यात बेबनाव झाल्याने स्वतःची युवाशक्ती संघटना भाजपमध्ये विलीन करून भांगडिया यांनी राजकारणात शड्डू ठोकले.
राजकीय अस्थिरता बघून वडेट्टीवार यांनी चिमूरऐवजी लगतच्या ब्रम्हपुरी क्षेत्रातून उमेदवारी मागितली. परिणामी काँग्रेसला आपले जुने निष्ठावान कार्यकर्ते डॉ. अविनाश वारजुरकर यांना मैदानात उतरवावे लागले. इथली निवडणूक बरच अटीतटीची झाली मात्र मोदी घटकामुळे भाजपने मैदान मारले. सध्याही उमेदवारीवरून काँग्रेस चाचपडत असली तरी ५ वर्षातील कार्यक्षमतेच्या मुद्यावर विद्यमान भाजप आमदार बंटी भांगडिया रेड झोन मध्ये आहेत. त्यांना तिकीटवाटपात डावलले जाते का ? ऐनवेळी भाजप एखादा वेगळा उमेदवार देते का ? यावर इथली समीकरणे अवलंबून असणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा (मतदारसंघ -गडचिरोली ) निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला ११५५६ मतांची आघाडी आहे.
2014 मध्ये या मतदारसंघात मिळालेली मते :-
5) वरोरा विधानसभा (Varora Vidhan sabha)
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या विधानसभा मतदारसंघाने भाजप-शिवसेनेसह देशाचे लक्ष वेधले. शिवसेनेतून आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसची तिकीट मिळवून खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम ज्या बाळू धानोरकर यांनी केला त्यांचा हा मतदारसंघ. हा मतदारसंघ पूर्णतः ओबीसीबहुल मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे केवळ काँग्रेसला अनुकूल असलेला हा मतदारसंघ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी पिंजून काढला.
या मतदारसंघात त्यांचा सामना इथल्या देवतळे परिवाराशी आहे. हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेणार का? की शिवसेनेला संधी देणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार पक्षाकडे या जागेसाठी फिल्डिंग लावत आहेत.
विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना इथून काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराचे मागणे पक्षाला मान्य करावेच लागेल अशी स्थिती आहे. असे झाल्यास इथल्या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल हे बघणे महत्वाचे असणार आहे. याशिवाय शिवसेनेला इथून तुल्यबळ उमेदवार मिळेल का? भाजपकडे ही जागा गेल्यास भाजप एखादा सरप्राईज उमेदवार देईल का यावर जय-पराजय अवलंबून असणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला १२४६० मतांची आघाडी आहे.
2014 मध्ये या मतदारसंघात मिळालेली मते :-
6) राजुरा विधानसभा (Rajura Vidhansabha)
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी मतदारांचा समावेश असलेला आणि तेलंगणा राज्याची सीमा जोडून असलेला मतदारसंघ म्हणजे राजुरा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघावर एकेकाळी शेतकरी संघटनेचे वर्चस्व होते. काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्यातील एकाची सरशी म्हणजे इथले राजकारण. २०१४ च्या मोदी लाटेत या मतदारसंघात प्रथमच भाजपला कौल दिला. ज्या मतदारसंघात भाजप जि. प. सदस्य निवडून आणताना दमछाक व्हायची तिथे चक्क आमदार निवडून आल्याने भाजपला अच्छे दिन येईल अशी आशा होती. मात्र भापचे संघटन या क्षेत्रात कमकुवत असल्याने आगामी काळात उमेदवार बदलून भाजपने नवा उमेदवार दिल्यास भाजपला विजयाची अधिक संधी आहे असे मानले जाते.
दुसरीकडे काँग्रेसकडे असलेले इच्छुक उमेदवार पीडित अल्पवयीन आदिवासी मुलींबाबत बेताल विधानाने अडचणीत आल्याने काँग्रेस सध्या बॅकफूटवर आहे. काँग्रेसदेखील वेगळा उमेदवार देऊ शकते अशी स्थिती आहे. याशिवाय शेतकरी संघटना नेते अड. वामनराव चटप पुन्हा एकदा रिंगणात असतील अशी स्थिती आहे. त्यांचा मतदारसंघात मोठा चाहता वर्ग आहे अशा स्थितीत भाजप शेतकरी संघटनेला सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करत काँग्रेसला वेगळे पाडते काय यावर इथला विजयी उमेदवार ठरणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला ३५२५२ मतांची आघाडी आहे. हा आकडा काँग्रेससाठी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
2014 मध्ये या मतदारसंघात मिळालेली मते :-
चंद्रपुरातील विधानसभा पक्षीय बलाबल (2014)
एकूण विधानसभा मतदारसंघ – ६
शिवसेना – १ (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर )
भाजप – ४
काँग्रेस – १
लोकसभा निवडणूक 2019 निकालाची अंतिम आकडेवारी
बाळू धानोरकर – काँग्रेस – 5,59,507 (विजयी)
हंसराज अहिर -भाजप – 5,14,774
राजेंद्र महाडोळे – वंचित – 1,12,079
चंद्रपूर- विद्यमान खासदार- बाळू धानोरकर – काँग्रेस