उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर तुळजापुरात असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याला एक धार्मिक तसेच राजकीय महत्त्व आहे. सर्वपक्षीय नेते निवडणूक प्रचाराची सुरुवात आई भवानीच्या आशीर्वादाने करतात. उस्मानाबाद जिल्हा हा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा कायमचा गड राहिलेला आहे.
गेली सलग २ टर्म उस्मानाबाद लोकसभा शिवसेनेच्या ताब्यात असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांचा शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी १ लाख २७ हजार ५६६ मतांनी दारुण पराभव करीत ओमराजे खासदार झाले आहेत. यापूर्वी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री डॉ पदमसिंह पाटील यांचा पराभव केला होता.
विधानसभा मतदारसंघ
उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा आणि परंडा असे ४ विधानसभा मतदारसंघ येतात. उस्मानाबाद आणि परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर काँग्रेस आणि उमरगा शिवसेनेकडे आहे. म्हणजे राष्ट्रवादीला २ तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक असे आमदार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप एकदाही भाजपचा आमदार विधानसभेवर निवडून आलेला नाही त्यामुळे जागा वाटपात त्यांचा दावा प्रबळ असून पहिल्यांदा कमळ फुलू शकते.
लोकसभेच्या निकालाचा परिणाम काय?
उस्मानाबाद विधानसभेवर राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील, तुळजापूरमध्ये काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण, परंडामध्ये राष्ट्रवादीचे राहुल मोटे, उमरगामध्ये शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले हे आमदार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा राजकीय अभ्यास केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी त्यांचे मतदारसंघ जणू त्यांच्यासाठी संस्थाने किंवा वतनदारीच आहे. मतदारसंघात या मंडळींचीच वंशपरंपरागत सत्ता आहे. डॉ पाटील, चव्हाण आणि मोटे या राजकारणातील मात्तबर घराण्याभोवती सत्ता केंद्रीत झालेली आहे. तर शिवसेनेचे मंत्री तानाजीराव सावंत आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर या मंडळींमुळे सेना-भाजपला संजीवनी मिळाली आहे. सेना भाजप युती झाल्यास जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीची संस्थाने खालसा होतील असे चित्र आहे.
२०१४ आणि २०१९ च्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत सर्वच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. मात्र ते चित्र विधानसभा निवडणुकीत कायम राहत नसल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे लोकसभेतील यशाने उत्साही न होता भाजप-सेनेने जमिनीवर पाय ठेवले पाहिजेत. मोदी लाटेतही उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची संस्थाने खालसा करता आली नाहीत हे सत्य आहे.
बाळासाहेबांचं स्वप्न
तुळजापूर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व 4 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ८४१२ मतांची, तुळजापूर २२,२८२ मतांची,परंडा २२,०७८ तर उमरगा मतदार संघात १९,६७६ मतांची आघाडी मिळाली आहे.
उस्मानाबादेतील प्रश्न
उस्मानाबाद जिल्ह्याला मिळणारे २१ टीएमसी पाणी, बंद पडलेले साखर कारखाने, सुनसान औदयोगिक वसाहती आणि त्यांचा न झालेला विकास,राजकीय नेत्यांनी व सम्राटांनी लुटलेल्या सहकारी संस्था,शैक्षणिक व वैद्यकीय असुविधा,सततचा कायम दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारी हे इथले ज्वलंत प्रश्न आहेत..शिक्षण असो की वैद्यकीय सुविधा लोकांना शेजारी असलेल्या लातूर सोलापूर व पुणे या जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते.
काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व
उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आघाडी सरकारच्या काळात न झालेल्या विकासाचे खापर नेहमी त्यांच्यावर फोडले जाते . भाजप शिवसेना युतीच्या गेल्या ४ वर्षाच्या काळात सोलापूर-तुळजापूर रेल्वे, २१ टीएमसी पाणी हे प्रश्न कागदोपत्री मार्गी लागले असले तरी या प्रकल्पासाठी म्हणावी तितकी आर्थिक तरतूद न झाल्याने हे प्रकल्प प्रत्यक्षात अवतरले नाहीत. एकही मोठा उद्योग प्रकल्प किंवा बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे आगामी काळात केवळ आघाडीवर टीका करण्यापेक्षा आणि सत्ता उपभोगण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून चुणूक दाखवून द्यावी लागेल.
- उस्मानाबाद विधानसभा – (Osmanabad Vidhan Sabha)
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघावर नेहमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. उस्मानाबाद विधानसभेवर डॉ पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत. १९७८ ते २०१४ या काळातील २००९ मधील पराभव सोडता या मतदार संघावर डॉ पदमसिंह पाटील यांचे एकहाती वर्चस्व राहीले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील हे १९७८ पासून सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले असून तो जिल्ह्यातील एक विक्रमच आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांचा शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी १६,९७४ मतांनी पराभव केला मात्र त्याचा वचपा आमदार राणा यांनी २०१४ च्या निवडणुकीत काढत ओमराजे यांचा १०,८०६ मतांनी पराभव केला. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात २००४ पासून डॉ पदमसिंह पाटील व कै पवनराजे निंबाळकर या घराण्यात सत्ता संघर्ष सुरु झाला तो आजवरही सुरूच आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात डॉ पदमसिंह पाटील यांना अटक करण्यात आली व त्यानंतर ओमराजे यांनी डॉ पाटील परिवारा विरोधात दंड थोपटत विरोध केला. ओम राजे यांचा विरोध आजही कायम असून ते शिवसनेच्या माध्यमातून खिंड लढवीत आहेत .
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राणा पाटील यांना ८८,४६९ , शिवसेनेचे ओमराजे ७७,६६३ अशी मते पडली तर भाजपकडून संजय पाटील दुधगावकर व काँग्रेसकडून विश्वास शिंदे यांनी निवडणूक लढविली. शिवसेना व भाजपच्या मतात विभागणी झाल्याने राष्ट्रवादीचे राणा पाटील याना आमदारकीची लॉटरी लागली . निवडणूक म्हणजे डॉ पाटील व राजेनिंबाळकर परिवार सत्तासंघर्ष असे जणू या मतदार संघातील गणीत आहे . यंदाही तोच पॅटर्न पाहायला मिळणार आहे कारण ओमराजे आता खासदार असून ते पूर्ण ताकतीने डॉ पाटील परिवाराला विजयापासून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसते.
२०१९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने तूर्तास तरी आघाडी व युती आहे. शिवसेनेकडून नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असून त्यांना परंपरेप्रमाणे कडवी झुंज देणारा संभाव्य उमेदवार म्हणून पहिले जाते. शिवसेनेचे संजय दुधगावकर , शिवाजी कापसे,अजीत पिंगळे ही मंडळी गुढग्याला बाशींग बांधून तयार आहेत. राष्ट्रवादीकडून नेहमीप्रमाणे राणा पाटील यांनाच उमेदवारी मिळू शकते.भाजपकडून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळेसह साखरसम्राट सुरेश पाटील यांनी चाचपणी व तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून विश्वास शिंदे,भाऊसाहेब उंबरे आदी इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा पाटील हे माजी राज्यमंत्री देखील होते . डॉ पाटील यांच्या रूपाने सत्तेचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. आमदार राणा यांना प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असल्याने ते विरोधी बाकावर असतानाही शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे प्रश्न अधिक तीव्रतेने व आक्रमकपणे मांडताना दिसतात. आमदार राणांची पत्नी अर्चनाताई या जिल्हा परिषद उपाध्यक्ष तर स्वतः राणा पक्षाचे जिल्हा प्रमुख असल्याने घराणेशाहीचा ठपका त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे मात्र कार्यकर्ते व मतदाराच्या कृपादृष्टीमुळे त्यांना विजयाचे सिंहासन मिळते. गेली अनेक दशके डॉ पाटील घराण्यात सत्ता असतानादेखील विकास खुंटलेला आहे. घरात कायम सत्ता असतानाही कुटुंबाच्या पलीकडे विकास झाला नाही.बंद पडलेला तेरणा साखर कारखाना,सूत मील,जिल्हा बँक, तेरणा ट्रस्ट हे मुद्दे कळीचे आहेत तर ग्रामीण भागात नेटवर्क व कार्यकर्ते यांची फ़ौज या जमेच्या बाजू आहेत.
सर्वपक्षीय कार्यकर्तेमध्ये वावर असलेले व जनाधार असलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर हे एकेकाळी राष्ट्रवादीत होते. राणा याचे सहकारी असल्याने त्यांना अनेक राजकीय डावपेच ज्ञात आहेत मात्र ते सत्तेसाठी प्रवाहासोबत पक्ष बदलतात व यश पदरात पडतात अशी ख्याती आहे.संजय दुधगावकर हे पूर्वी काँग्रेस त्यानंतर भाजप व आता शिवसेना अश्या राजकीय प्रवासाने भूमिका बदलतात तर शिवाजी कापसे व अजीत पिंगळे हे कळंब तालुक्यापुरतेच मर्यादीत आहेत. शिवसेनेला विजयश्री हवा असेल तर जनाधार असलेला व राजकारणात मुरब्बी पैलवानाला रिंगणात उतरावे लागणार आहे. भाजपला जनमानसातला चेहरा नसला तरी त्यांची कमान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अवलंबुन असणार आहे. भाजपमधील एखाद्याला उत्सुक उमेदवारी न मिळाल्यास तो बंडाचे निशाण फडकावून अपक्ष लढू शकतो. युती झाली तरच राष्ट्रवादी विरोधात विजयश्री शक्य आहे . उस्मानाबाद मतदार संघात वंचीत बहुजन विकास आघाडीमुळे सर्वच उमेदवार यांना धडकी बसली आहे, वंचीतमुळे विजयाचे गणीत बिघडू शकते.
2) तुळजापूर विधानसभा – (Tuljapur Vidhan Sabha)
तुळजापूर मतदार संघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत, मधुकरराव चव्हाण या मतदार संघातून ५ वेळेस आमदार असून २०१९ च्या निवडणुकीत विजयाचा षटकार मारणार का हे पाहावे लागेल. धोतर कुर्ता असा पेहराव असलेले जे विधिमंडळातील बुजुर्ग आमदार .. २०१४ च्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना ७०,७०१ मते पडली तर राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांना ४१,०९१ मते पडली त्यामुळे चव्हाण २९,६१० मतांनी निवडून आले.यंदा आघाडी ठरल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर आहे.
८५ वय असतानाही एखाद्या तरुणाला लाजवेल अश्या जिद्दीने ते मतदार संघात संपर्क साधतात , जनतेची थेट संपर्क व कामे करणे ही त्यांच्या जमेची बाजू असली तरी तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका न झालेला विकासासह बंद पडलेले साखर कारखाने,सूत मील यामुळे टीका होते. तरुण आमदार हवा असे विरोधक प्रत्येक निवडणुकीत घोकतात मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. आमदार चव्हाण माजी मंत्री होते मात्र त्यांच्या काळात मोठे उद्योग,व्यवसाय आले नाहीत. तुळजापूर शहर व नळदुर्ग किल्ला परिसरात पर्यटन विकासाची कामे मधुकरराव चव्हाण यांच्या काळात मार्गी लागली.
मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख,संजय निंबाळकर,देवानंद रोचकरी,अनील काळे यांच्यासह अनेक जण उत्सुक आहेत तर शिवसेनेकडून कैलास पाटील व इतर मंडळी प्रयत्नशील आहेत. विरोधकांत झालेल्या मत विभागणीमुळे आमदार चव्हाण यांना विजय मिळतो. देवानंद रोचकरी हे प्रत्येक विधानसभा लढवितातच,त्यांना वयक्तिक मानणारा एक गट आहे. १९९९ पासून रोचकरी आमदार बनण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यासाठी ते कधी अपक्ष,समाजवादी पक्ष,शेकाप तर कधी मनसे असा त्यांचा प्रवास आहे यावेळी ते भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. तुळजापूर मतदार संघात राजकीय गणित अजब आहे कारण विधानसभेला अनेक जण चव्हाण यांना अंतर्गत मदतीचा हात देतात. राष्ट्रवादीचे महेंद्र धूरगुडे हेही उत्सुक असून उद्योजक अशोक जगदाळे यांनी मोर्चेबांधणी केली आहे.राष्ट्रवादीचे असलेल्या जगदाळे यांनी सध्या जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्वाच्या सत्तापिपासून वृत्तीमुळे फारकत घेतली असून शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मतदार संघात शिवसेना व भाजपची ताकत वाढल्याने आमदार चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर झाला आहे.
3) परंडा विधानसभा – (Paranda Vidhan Sabha)
परंडा मतदार संघावर राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्राबल्य.. कै महारुद्र मोटे २ वेळेस सलग आमदार होते यांच्यानंतर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटील सलग २ वेळेस आमदार . कोणताही नेता सलग २ वेळेस पेक्षा अधिक काळ आमदार होत नाही असे या मतदार संघाचा अनुभव होता मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी २००४,२००९ व २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रीक करून इतिहास घडविला. मोदी लाटेतही त्यांनी गड राखला , मोटे परिवारात ५ वेळेस आमदारकी आहे.२०१४ च्या निवडणुकीत राहुल मोटे ७८,५४८ मते तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांना ६६,१५९ मते पडल्याने मोटे १२,३८९ मतांनी विजयी झाले.
राष्ट्रवादीकडून आमदार राहुल मोटे यांची उमेदवारी नक्की असून शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत निवडणूक लढवू शकतात.पालकमंत्री सावंत हे जरी विधानपरिषदेवर असले तरी त्यांचा जनतेतून विधानसभेवर जाण्यावर भर आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी असलेला मतदार संघ म्हणून परंड्याची ओळख आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे मतदार संघात त्यांच्या सोयीनुसार राजकीय उपयुक्त व उपद्रव मूल्य दाखवितात असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे त्यांची पडदयाआडची भूमिकाही महत्वाची आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यामुळे परंडा मतदार संघात अनेक ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज संस्थेत कमळ फुलले असून पक्ष बांधणी केली आहे. भाजपकडून संजय गाढवे उत्सुक असून रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हेही प्रयत्नात आहेत. विरोधकांची मत विभाजन हे नेहमी आमदार मोटे यांना फायद्याचे ठरते. परंडा मतदार संघात अनेक गावपुढारी आमदार होण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहत आहेत. यातील एखाद्याला उमेदवारी न मिळाल्यास तो वंचित आघाडीची साथ घेऊ शकतो.या मतदार संघात धनगर समाजाचे मतदान निर्णायक असल्याने त्यांची मनधरणी करावी लागले.
पालकमंत्री सावंत स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्यास सर्व आघाड्यावर मोटे यांची दमछाक होऊ शकते. सावंत यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामे,नदी नाला खोलीकरण,सामूहिक विवाह सोहळे, दुष्काळात केलेली सामान्यांना मदत,चारा छावणी यासह साखर कारखाना माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आधार त्यामुळे सावंतांना मोठा जनाधार लाभला आहे. सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने विरोधकांसह अनेकांना धास्ती बसली आहे. सावंत यांचे नियोजनबद्ध काम व विकास कामाचे व्हिजन त्यांना यशाच्या शिखरावर पोहचविते. सावंत यांच्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची मरगळ गेली असून शिवसैनिकात चैतन्याचे वातावरण आहे. सावंत यांच्या विजयाची घोडदौड सुरू असून त्यांच्या राजकीय डावपेचीमुळे शिवसेनेला अनेक सत्ताकेंद्रे काबीज करता आली आहेत त्यामुळे बेरजेच्या राजकारणात सावंतांचा कोणीही हात पकडू शकत नाही.
मोटे परिवारात ५ वेळेस आमदारकी होती त्यामुळे विकासाची सर्वस्वी जबाबदारी त्यांची होती मात्र म्हणावा तितका विकास झाला नाही. एमआयडीसी,सिंचनाची कामे म्हणावी तितकी झाली नाहीत. शैक्षणिक,वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत.बंद पडलेले साखर कारखाने,दूध केंद्र व काही स्वकीयांनी सोडलेली साथ त्यांची डोकेदुखी वाढवू शकते. आमदार मोटे मितभाषी व सुसंस्कृत नेतृत्व अशी ओळख आहे त्यामुळे त्यांना जनतेचे पाठबळ आहे शिवाय त्यांच्या पत्नी वैशाली यांचे महिला सक्षमीकरण,मेळावे व बचत गट यात मोठे कार्य असल्याने त्यांच्या महिला मंडळाच्या फळीचे आमदार मोटे यांना पाठबळ मिळते.
4) उमरगा विधानसभा – (Umarga Vidhan Sabha)
उमरगा विधानसभा मतदार संघ हा १९९५ नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले हे दोघेही २ वेळेस आमदार राहिले आहेत. रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौघुले आमदार झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांचे खासदारकीचे तिकीट कापल्यानांतर त्यांनी उघडपणे केलेले बंड व त्यावेळी विद्यमान आमदार चौघुले यांनी साधलेले सूचक मौन २०१९ च्या विधानसभा तिकीट वाटपवेळी पथ्यावर पडू शकते. सध्या चौघुले हे गायकवाड बोले तैसे चाले असे असले तरी त्यांनी कार्यकर्ते यांचा गट सक्रीय केला आहे. माजी खासदार गायकवाड यांनी उघड विरोध करूनही शिवसेनेला २०१९ च्या लोकसभेत तब्बल १९ हजारांची विक्रमी आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गायकवाड आता त्यांचे पुत्र किरण यांच्या भवितव्यासाठी धडपडत आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले यांना ६५,१७८ नंतर तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किसन कांबळे यांना ४४,७३६ मते पडली व चौघुले २०,४४२ मतांनी विजयी झाले . गुरु शिष्य जोडीच्या लोकसभेतील भूमिकेमुळे शिवसेना पक्षश्रेष्टी उमेदवारीची भाकरी पलटवणार का ? यांची मतदार संघात जोरदार चर्चा आहे. मात्र चौघुले यांचे समाधानकारक काम, मातोश्रीच्या दरबारी असलेली निष्ठा व स्वच्छ प्रतिमा त्यांना तारू शकते. भाजपकडून कैलास शिंदे,काँग्रेसकडून दिलीप भालेराव, किसान कांबळे,सेनेकडून विलास व्हटकर इच्छुक आहेत. जनतेशी संपर्क, कार्यकर्त्यांशी आत्मीयता व स्नेहभाव या चौघुले यांच्या जमेच्या बाजू आहेत तर उद्योग,शिक्षण क्षेत्रात न झालेला विकास,बेरोजगारी हे मुद्दे अडचणीचे आहेत.
उस्मानाबादमधील पक्षीय बलाबल 2014
एकूण विधानसभा मतदारसंघ 4
उस्मानाबाद विधानसभा २०१४ निकाल –
तुळजापूर विधानसभा २०१४ निकाल –
उमरगा विधानसभा २०१४ निकाल –
परांडा विधानसभा २०१४ निकाल –