वर्ध्याचा आढावा : विधानसभेला वर्ध्यात पुन्हा 50-50?

| Updated on: Aug 29, 2019 | 4:57 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार आहेत.  

वर्ध्याचा आढावा : विधानसभेला वर्ध्यात पुन्हा 50-50?
Follow us on

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार आहेत.

वर्धा जिल्हा कधीकाळी काँग्रेसचा गड राहिला. पण, लोकसभेसोबतच विधानसभांमध्येही या गडाला कधी खिंडार पडले ते काँग्रेसला कळलेच नाही. हिंगणघाटमध्ये सुरूवातीचा काळ वगळता काँग्रेसला कधी यश आले नाही. देवळी मतदारसंघात काँग्रेसचा गड मागील दोन तपांपासून अभेद्य राहिला आहे. आर्वी मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या  ताब्यात आहे.वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील  दोन निवडणुकांपासून काँग्रेसला विजय संपादित करता आलेला नाही. वर्ध्यातील चार विधानसभा मतदारसंघात सध्या फिफ्टी, फिफ्टी म्हणजेच वर्धा, हिंगणघाट असे दोन मतदारसंघ भाजपकडे तर आर्वी आणि देवळी असे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.

जिल्ह्यात सध्या भाजपची पाळमुळं खोलवर पसरलेली आहेत. लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या  उमेदवाराने बाजी मारली होती. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढणार की काँग्रेस गेलेल्या जागा परत मिळवित आहे त्या राखणार, हे बघणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

1 ) वर्धा विधानसभा (Wardha Vidhan sabha)

भाजपचे पंकज भोयर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2014 च्या निवडणुकीत पंकज भोयर यांनी काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा पराभव केला.

वर्धा विधानसभा मतदारसंघावर दशकभरापूर्वी काँग्रेसचाच झेंडा राहिला. काँग्रेसचे दिवंगत नेते प्रमोद शेंडे यांची या मतदारसंघावर मजबूत पकड होती. त्यांच्या निधनानंतर पुत्र शेखर शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, वडिलांचा राजकीय वारसा मिळालेला असताना शेखर शेंडे यांना सलग दोन वेळा पराभूत व्हावे लागले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सहकार नेते सुरेश देशमुख यांनी तर दुसर्‍यांदा काँग्रेसमधूनच भाजपमध्ये गेलेले पंकज भोयर यांनी कमळ फुलवत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

मागील वेळी काँग्रेसचे शेखर शेंडेविरूद्ध भाजपचे पंकज भोयर अशी लढत झाली होती. त्यात भाजपने बाजी मारली होती. या मतदारसंघात वर्धा शहरासह सेलू तालुक्याचा समावेश आहे. सेलू तालुका केळीकरीता प्रसिद्ध राहिला. पण, कालांतराने विविध अडचणींमुळे शेतकर्‍यांनी केळीचे उत्पादन कमी करीत इतर उत्पादने घेण्याकडे वळले.

वर्धा गांधीजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. गांधीजींचा नारा स्वावलंबन आणि गावाकडे चला असाच राहिला आहे. पण, शहरीकरणाच्या नादात हा नारा कधी मागे पडला माहितच पडले नाही. रोजगाराच्या संधी जेमतेम आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्याकरीता रोजगार निर्मिती करणे, उद्योग उभारणे, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

विद्यमान आमदार भाजपचे डॉ. पंकज भोयर आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा 8550 मतांनी पराभव केला. आमदार भोयर यांना तिकीटाकरीताही यावेळी पक्षांतर्गत आव्हान असणार आहे. येथील लढत काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच राहणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर उमेदवारी पक्की मानली जात आहे. काँग्रेसमध्ये चढाओढ असली तरी शेखर शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुखही दावा करू शकतात. बसपा, वंचित आघाडीचे उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीत.

मागील तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल

*वर्धा विधानसभा २००४ निकाल*

१) प्रमोद शेंडे – काँग्रेस – ५३९६३ मते

२) श्याम गायकवाड  – अपक्ष – ३४७३१ मते

३) डॉ शिरीष गोडे – बसपा – १५५१९ मते

४) रविकांत बालपांडे – शिवसेना –  १०८८३ मते

*प्रमोद शेंडे – काँग्रेस – विजयी- १९२३२ मते*

*वर्धा विधानसभा २००९ निकाल*

१) सुरेश देशमुख – अपक्ष – ५१७३५ मते

२) शेखर प्रमोद शेंडे – काँग्रेस – ४०३१६ मते

३) रविकांत बालपांडे – शिवसेना – २१९०९

४) श्याम गायकवाड – अपक्ष – १२१०३

*सुरेश देशमुख – अपक्ष – विजयी- ११४१९ मते*

वर्धा विधानसभा २०१४ निकाल*

१) डॉ पंकज भोयर – भाजपा – ४५८९७ मते

२) शेखर प्रमोद शेंडे – काँग्रेस – ३७३४७ मते

३) नीरज गुजर – बसपा – २२२८३

*डॉ पंकज भोयर – भाजपा- विजयी- 8550 मते*

2) आर्वी विधानसभा मतदारसंघ (Arvi Vidhan sabha)

काँग्रेसचे अमर काळ हे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दादाराव केचे यांचा पराभव केला.

आर्वी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचीच सरशी राहिली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते स्व. शरद काळे त्यावेळी सलग चारवेळा आमदार राहिले होते. शरद काळे यांच्या निधनानंतर चिरंजीव अमर काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. अमर काळे यांना घरीच राजकारणाचे धडे मिळाले. पण, २००९ च्या निवडणुकीत येथे भाजपकडून दादाराव केचे विजयी झाले आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये अमर काळे यांनी तीन हजार मतांनी भाजपचे दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसचा गड परत मिळविला. पण, यावेळची आव्हान वेगळी असणार आहे.

भाजपमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा निर्माण झाली आहे. येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुधीर दिवे आणि सहकार नेते श्रीधर ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे तिकीट मिळण्याकरीता जोर लावून आहेत. काँग्रेसमध्ये अमर काळे यांच्यापुढे कुणाचे आव्हान नसले तरी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा झालेला सुपडासाफ चिंतेचा विषय ठरू शकतो. बसपा तिसर्‍या क्रमांकावर राहिली असून, सहकार गट खिळखिळा झाला आहे. वंचित फॅक्टर, शिवसेना, युवा स्वाभिमानी पार्टीही येथे महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मागील तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल

*आर्वी विधानसभा २००४ निकाल*

१) अमर काळे  – काँग्रेस – ७०९३८ मते

२) दादाराव केचे  – भाजपा – ४५८६१ मते

३) प्रशांत सव्वालाखे – बसपा – ९१९४ मते

*अमर काळे  – काँग्रेस – विजयी- २५०७७ मते*

*आर्वी  विधानसभा २००९ निकाल*

१) दादाराव केचे – भाजपा – ७१६९४ मते

२) अमर काळे – काँग्रेस – ६८५६४ मते

३) रुपचंद टोपले  – बसपा – ५४४३ मते

*दादाराव केचे – भाजपा – विजयी- ३१३० मते*

*आर्वी विधानसभा २०१४ निकाल*

१) अमर काळे – काँग्रेस – ७५८८६ मते

२) दादाराव केचे – भाजपा – ७२७४३ मते

३) दादाराव उईके – बसपा – ५३४८ मते

*अमर काळे – काँग्रेस – विजयी- ३१४३ मते*

3) देवळी विधानसभा मतदारसंघ (Deoli Vidhan sabha)

काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार रणजित कांबळे यांचं इथे प्रभुत्व आहे. देवळी मतदारसंघ कायमच काँग्रेससोबत राहिला आहे. सरोज काशिकर यांचा अपवाद वगळता इतरांना कुणाला येथे यश मिळाले नाही. काँग्रेसचे माजी मंत्री विद्यमान आमदार रणजित कांबळे येथून पाचव्यांदा निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यापुढे भाजप, बसपाचे तगडे आव्हान आहे.

भाजपमध्ये तिकीट मिळविण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी आमदार सरोज काशिकर यांचे चिरंजीव वैभव काशिकर यांच्यात स्पर्धा सुरू आहे.

दुसरीकडे शिवसेनेनेदेखील हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा, यासा   ठी प्रयत्न चालविले आहेत. मागील २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा 943 मतांनी पराभव केला होता. बसपाच्या उमेदवाराला मिळणारी मते अधिक असतात. यावेळी वंचित बहुजन आघाडीदेखील परिणामकारक असेल. असे असले तरी मतदारसंघाचा बारिक अभ्यास, केलेली विकासकामे रणजित कांबळेंसाठी जमेची बाजू असली तरीही त्यांच्यासाठी वाट बिकटच आहे.

मागील तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल    

*देवळी  विधानसभा २००४ निकाल*

१) रणजित कांबळे – काँग्रेस – ५८८३६ मते

२) सरोज काशीकर  – स्वभाप – ३८१५१ मते

३) प्रदीप ठाकूर  – बसपा – १९२२३ मते

*रणजित कांबळे   – काँग्रेस – विजयी- २०६८५ मते*

*देवळी  विधानसभा २००९ निकाल*

१) रणजित कांबळे – काँग्रेस – ५८५७५ मते

२) रामदास तडस  – भाजपा – ५४८२० मते

३) विजय राऊत – बसपा – १५७६६ मते

*रणजित कांबळे – काँग्रेस – विजयी- ३७५५ मते*

*देवळी विधानसभा २०१४ निकाल*

१) रणजित कांबळे – काँग्रेस – ६२५३३ मते

२) सुरेश वाघमारे – भाजपा – ६१५९० मते

३) उमेश म्हैसकर – बसपा – २४९७३ मते

*रणजित कांबळे  – काँग्रेस – विजयी- ९४३ मते*

4) हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ (Hinghat Vidhan Sabha)

 भाजपचे समीर कुणावार हे विद्यमान आमदार आहेत.

हिंगणघाट मतदारसंघ शेतकरी संघटनेकरीता अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. शेतकरी संघटनेची धग कमी होत आली आणि या मतदारसंघातील पकडही सैल होऊ लागली. संघटनेच्या आंदोलनांमध्ये केंद्रस्थानी राहिलेला हिंगणघाट मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहे. येथे अशोक शिंदे हे शिवेसेनेकडून तीनवेळा आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांनाही एकदा या मतदारसंघाने संधी दिली आहे.

मागील २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून समीर कुणावार चांगल्या मताधिक्क्याने विजयी झालेत. त्यावेळची लढत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी तिहेरी झाली होती. यावेळी त्यांच्या नावाला भाजपमधून कुणाचे आव्हान असल्याचे दिसत नाही. पण,अंतर्गत कुरबुरींचा त्यांना सामना करावा लागू शकतो.

शिवसेना येथे तीनदा विजयी झाली असल्याने युती झाल्यास या मतदारसंघावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजू तिमांडे यांच्यापुढे सहकार नेते, राज्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांचे आव्हान असणार आहे.

काँग्रेसकडून कृष्णा व्यापारी यांच्यासह इतर नावांची चर्चा आहे.मनसेकडून अतुल वांदिले रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. येथे बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीदेखील परिणामकारक राहणारी आहे. मागील तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल

*हिंगणघाट  विधानसभा २००४ निकाल*

१) राजू तिमांडे  -राष्ट्रवादी काँग्रेस – ८२६३० मते

२) अशोक शिंदे  – शिवसेना – ५६२५८ मते

३) धनराज चोपडे  – बसपा – १०७६६ मते

*राजू तिमांडे – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी- २६३७२२ मते*

*हिंगणघाट  विधानसभा २००९ निकाल*

१) अशोक शिंदे  – शिवसेना  – ५१२८५ मते

२) समीर कुणावार – अपक्ष – ४९८६४ मते

३) राजू तिमांडे -राष्ट्रवादी काँग्रेस – ३८६८५ मते

*अशोक शिंदे – शिवसेना  – विजयी- १४२१ मते*

*हिंगणघाट  विधानसभा २०१४ निकाल*

१) समीर कुणावार – भाजपा – ९०२७५ मते

२) प्रलय तेलंग – बसपा  – २५१०० मते

३) राजू तिमांडे – राष्ट्रवादी  – २३०८३ मते

*समीर कुणावार   – भाजपा – विजयी- ६५१७५ मते*

वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील ठळक मुद्दे

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बेरोजगारी, शेतीच्या समस्यांचा प्रश्न गंभीर आहे. बोटावर मोजण्याइतक्या उद्योगां व्यतिरिक्त उद्योग नाहीत. वर्धा आणि देवळी या दोन्ही एमआयडीसी देवळी विधानसभा मतदारसंघात येतात. कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आहे. सिंचन, कर्जमाफी, बेरोजगारी, शेतीविषयक अडचणी आदी मुद्यांवर ही निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या फारशा संधी नाहीत. येथे वंचित फॅक्टर, मराठा मोर्चाचा फारसा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता नाही.

भाजप आमदार असलेल्या ठिकाणी अधिक निधी –

★सत्ता आणि विरोधातील आमदारकीचा फरक यावेळी प्रकर्षाने जाणवला. हिंगणघाट, वर्धा विधानसभा मतदासंघाकरीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला. हिंगणघाट येथे समीर कुणावार यांनी मोठा निधी आणत कामांचा धडाका लावला. पण, अनेक विकासकामे आजही करावयाची आहेत. कामगारांच्या मोठ्या समस्यांना घेऊन विरोधक त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. सिंदी येथे अद्यापही ड्रायपोर्टचे काम सुरू झाले नाही. हा मुद्दादेखील प्रभावी ठरू शकतो.

★वर्धा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मोठा निधी आणला. वेगवेगळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या काळात त्यांनीपक्षात वरिष्ठ पातळीवर संबंध जपले. पण, स्थानिक पातळीवर भाजपाचे काही जण दुखावले गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांतर्गत आव्हानासोबतच काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रमुख आव्हान असणार आहे. येथेही बेरोजगारी,शहरातील समस्या, शेतीच्या अडचणी हे मुद्दे प्रभावी राहण्याची शक्यता आहे.

★देवळी मतदारसंघात स्वत: खासदारच आहेत. त्यामुळे येथेही निधी मिळाला. रणजित कांबळे यांच्यापुढे पक्षांतर्गत हेवेदावे क्षमविण्यासोबतच विरोधकांना परास्त करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. भाजपलाही अंतर्गत कुरघोडींचा सामना करावा लागू शकतो.

★आर्वीत माजी आमदार दादाराव केचे यांनी भाजपची सत्ता असल्याने वेगवेगळीकामे आणण्याचा प्रयत्न करून जनसंपर्क कायम ठेवण्यासोबतच तिकीटावर दावा केला आहे. अमर काळे यांनीही मतदारांपर्यंत पोहोचून पाच वर्षांत संपर्क सातत्य राखले आहे. पण, प्रकल्पग्रस्त असो की उद्योग या प्रश्नांचे हत्यार उपसून अमर काळे यांच्यापुढे आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे.