मुंबई: राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Shivsena leader Sanjay Raut slams BJP)
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे, असा सूचक इशारा देणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. तीन महिन्यांत सरकार पडेल, हा सुधीरभाऊंचा विनोद चांगला होता. राज्यातील प्रमुख नाट्यनिर्माते आम्हाला फोन करतात. काही सवलत देण्याची मागणी करतात. मात्र, त्याची काही गरज नाही. सुधीर मुनगंटीवार यांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर तुफान गर्दी होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
‘सामना’त अग्रलेख लिहला गेला म्हणजे घाव वर्मी बसला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस सामना वाचतात ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना जगात काय सुरु आहे, हे कळेल. देवेंद्रजींनी सामना वाचायची सवय लागली असेल तर कौतुक आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता.
राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
VIDEO: ‘तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा’
(Shivsena leader Sanjay Raut slams BJP)