मुंबई : मुंबईत आज सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ (Mahamorcha) काढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात अग्रस्थानी आहे. तर हिंदू देवीदेवतांच्या अपमानाविरोधात सत्ताधाऱ्यांच्या वतीने ‘माफी मांगो’ (Mafi Mango Andolan) आंदोलन करण्यात येतंय.
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महामोर्चाला दोन लाख लोक येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात येतंय. सकाळी 9 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीत मोर्चेकरी जमतील. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होईल. तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या वादावरून भाजपातर्फे मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे.
सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली, संत एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला. हा महाराष्ट्र द्रोह नाही का?, असा सवाल विचारत भाजप नेते आशिष शेलार यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. त्यामुळे आज मुंबईच्या रस्त्यांवर सत्ताधारी आणि विरोधक पाहायला मिळतील.