महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला, ‘या’ दिवशी जाहीर होणार पहिली यादी

| Updated on: Sep 30, 2024 | 11:17 AM

एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला, या दिवशी जाहीर होणार पहिली यादी
Follow us on

Mahayuti Seat Sharing Formula : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या महायुतीत जागावाटप, मुख्यमंत्रिपद यावरुन चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. येत्या नवरात्रीत महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील पक्षांचे 80 टक्के जागांवर एकमत झाले आहे. त्यामुळे आता नवरात्रीच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून 40 ते 50 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.

80 टक्के जागा वाटपावर एकमत

महायुतीच्या घटक पक्षांकडून 80 टक्के जागा वाटपावर एकमत झाले आहे. यानुसार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 125 ते 140 जागा लढवणार आहे. तर शिंदे गट 70 ते 75 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. कमी जागा लढवून त्या जिंकून स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आणि सत्तेत प्रमुख पदावर दावा करायचा, असा मानस शिवसेनेने केला आहे.

माझी उमेदवारी फक्त औपचारिकता, किशोर पाटील यांची प्रतिक्रिया

याबद्दल आता आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षांचं सूत्र ठरलेलं आहे. ज्या जागेवर विद्यमान आमदार आहे त्या जागेवर तिन्ही पक्ष चर्चा करतील. मी विद्यमान आमदारांमध्ये येतो त्यामुळे माझी उमेदवारी फक्त औपचारिकता आहे, असे आमदार किशोर पाटील म्हणाले.

“गेल्यावेळी युती असताना भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ होता. आजही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ आहे. परंतु आपल्याला दुसऱ्याला नगण्य समजता येईल, असं होणार नाही. तिन्ही पक्षांचं सुंदर असं ताळमेळ आहे. फक्त बाहेर एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिन्ही पक्षांना त्यांच्या परिस्थितीनुसार शंभर टक्के न्याय मिळेल”, असे किशोर पाटील यांनी म्हटले.

शंभर टक्के महायुतीचेच सरकार येईल

“महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी जरी ठरवलं तरी शंभर टक्के महायुतीच्याच सरकार येईल, बांधवांनी दिलेलं सर्व बोनस असेल. आमच्या लाडक्या बहिणींनी लोकसभेला पाहिलं आहे, याच विरोधकांनी याच सावत्र भावांनी अशाच पद्धतीने एक निगेटिव्ह सेट केला होता. मुस्लिम बांधवांना घाबरवलं. आपला समाज, आपला धर्म धोक्यात आहे. इकडे बौद्ध बांधवांना घटना धोक्यात सांगून फसवलं. आज शंभर टक्के बहुमताने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहे. काय झालं धर्माचं, काय झालं समाजाचं, काय झालं घटनेचं”, असा सवालही किशोर पाटील यांनी उपस्थित केला.