लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावरून आणि येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाच्या किती जागा निवडून येतील यावर दावे केले जात आहेत. महाविकास आघाडीने तर आमच्या 154 जागा निवडून येतील असा दावा केला आहे. मात्र, महायुतीने विधानसभा निवडणुकीत कोणताही दावा केला नव्हता. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आकडाच जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या 200 जागा निवडून येऊ शकतात, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबईत आज महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधितक करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचं गणितच समजून सांगितलं. नुकतीच लोकसभा पार पडली. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणते आमचा विजय झाला. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र आपणही गाफील राहिलो, अशी कबुली देतानाच फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सत्य चिरकाल जिवंत राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल. दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही माहीत नाही, असा टोला लगावतानाच आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो अन् ते सकाळी येऊन काही तरी वेडंवाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील, आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेलं. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सर्वपक्षीयांना सांगतो की, आपल्यात एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. खुमखुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दात महायुतीच्या वाचाळवीर प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं.