मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड (Bollywood) निर्मात्यांशी चर्चा करुन उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ते उत्तर प्रदेशात मुंबईसारखी फिल्मसिटी (FilmCity) बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने (ShivSena) योगींना लक्ष्य केले आहे. “उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल”, असा खोचक सल्ला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून योगींना देण्यात आला आहे. (Maintain law and order then FilmCity will be formed automatically in Uttar Pradesh; ShivSena slams Yogi Adityanath)
योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली.
योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे.
योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे. योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये? पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली. अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे.
गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्मसिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे.
योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्मसिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही?’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्मसिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार? मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय? उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबाडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय?
उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 आणि 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे? की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे? एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.
संबंधित बातम्या
“योगींच्या नव्या फिल्मसिटीचे देशभरात स्वागत, सरकारच्या पोटात काय दुखतंय?”, राम कदमांचा टोला
बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का; गुलाबराव पाटलांचा योगींना टोला
बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; आठवलेंचा योगींना घरचा आहेर
(Maintain law and order then FilmCity will be formed automatically in Uttar Pradesh; ShivSena slams Yogi Adityanath).