नवी दिल्ली: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासोबत आता राज्यात संघटनात्मक पातळीवरही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी राज्यातील काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल झाल्यानंतर या नेत्यांच्या वरिष्ठांशी भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. (Major changes may happen in Maharashtra Congress)
काही वेळापूर्वीच विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील आणि पवनकुमार बन्सल यांची भेट घेतली. त्यामुळे आता या भेटीगाठीनंतर काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत बदल होणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेते इच्छूक आहेत. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आहेत. त्यामुळे आता काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे काढून घेणार का, हे पाहावे लागेल. सध्याच्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले आणि सुनील केदार यांची नावे चर्चेत आहेत.
महाराष्ट्रातील संघटनात्मक फेरबदलांविषयी काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्र चे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेस चे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्राचे प्रभारी सचिव उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील संघटन फेरबदल व जिल्हा अध्यक्ष बदलण्याबाबतही चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे. नागपूर विकास ठाकरे, वर्धा मनोज चांदूरकर, यांच्यासह अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे खांदेपालट होणार, की गायकवाडांवरील जबाबदारी कायम राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.
मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) काल, तर एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आज दिल्लीत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्याच्या चर्चांना जोर आला असतानाच या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
संबंधित बातम्या:
महापालिका, ग्रामपंचायतीच्या लढाईआधीच मविआत ‘स्वबळाचे’ वारे?
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल
मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?
(Major changes may happen in Maharashtra Congress)