पुणे : शिवसेनेने 10 रुपयात थाळी अशी घोषणा केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar Uddhav Thackeray) यांनी सडकून टीका केली आहे. 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्याचं यांना आत्ता सुचलं. मग गेली पाच वर्षे यांना कुणी रोखलं होतं? झोपा काढत होते का? दोन्ही पक्षांचे मंत्री मंत्रालयात बसतात. एव्हाना गोरगरीबांना सेवा पुरवू शकत होते. पोकळ आश्वासनं देणं हा सत्तेत असणाऱ्या नेतेमंडळींचा स्वभाव आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar Uddhav Thackeray) म्हणाले.
पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता. शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी करुन दिली. शिवाय या राजीनामा नाट्यानंतर अजित पवारांना अश्रूही अनावर झाले होते. पण तो एक भावनिक क्षण होता, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या ‘उमेदवार मेळाव्या’ला संबोधित केलं आणि उमेदवारांना मार्गदर्शनही केलं. “विधानं जपून करा. वर्तणुकीतून कार्यकर्त्यांत, जनतेत गैरसमज निर्माण होऊन आहेत ती मतं वजा होणार नाहीत याची खबरदारी बाळगा. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष काळजी घ्या,” अशा सूचना अजित पवारांनी केल्या.
दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणूक लक्षात ठेवूनच काम करा, असंही मार्गदर्शन अजित पवारांनी केलं. “विधानसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार जास्तीच्या मताधिक्याने निवडून आल्यास पुढे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लढवणं सोपं जाईल. या अनुषंगाने आघाडीच्या उमेदवारांचा निष्ठेने प्रचार करा,” असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
“शिक्षणाचा खेळखंडोबा, महिला सुरक्षा, शेतमालाला भाव, उत्पादक-ग्राहक असमाधानी, शेतकरी कर्जमाफी, वंचित-मागास-भटक्या-आदिवासी जमातींना योजनांचा लाभ न मिळणं, पाच लाख कोटींनी राज्य कर्जबाजारी अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीची भूमिका कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावी, अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या.