नाना पटोले यांच्याऐवजी यांना प्रदेश अध्यक्ष बनवा; पटोले यांच्याविरोधात नेते रायपूरला जाऊन हायकमांडला भेटणार

| Updated on: Feb 24, 2023 | 12:42 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गटबाजी आणली. काँग्रेसची मुख्य व्होटबँक असलेल्या दलीत, मुस्लीम, आदिवासी यांच्या विरोधात आहे. ते मनमानी करत आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरु करणार असं ते सांगतात.

नाना पटोले यांच्याऐवजी यांना प्रदेश अध्यक्ष बनवा; पटोले यांच्याविरोधात नेते रायपूरला जाऊन हायकमांडला भेटणार
नाना पटोले
Image Credit source: Google
Follow us on

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गटबाजी आणली. काँग्रेसची मुख्य व्होटबँक असलेल्या दलीत, मुस्लीम, आदिवासी यांच्या विरोधात आहे. ते मनमानी करत आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरु करणार असं ते सांगतात. कुणाचं ऐकत नाही. त्यामुळे नाना पटोले यांना हटवा आणि आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशध्यक्षपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या २१ नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांच्याकडे केलीय. प्रदेश काँग्रेस सचिव खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यासोबत २१ पदाधिकाऱ्यांनी रमेश चिन्निथाला यांची भेट घेतलीय. नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यासाठी, हे नेते हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जाणार आहेत. त्यानंतर दिल्लीला जाणार, असंही प्रदेश काँग्रेस सचिव खान नायडू यांनी सांगितलं.

काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलवा

विदर्भातूनच नाना पटोले यांच्या प्रदेश अध्यक्षपदाला सुरुवातीला विरोध झाला. आशिष देशमुख यांनी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलवा, अशी मागणी केली. त्यानंतर नाशिक पदवीधर निवडणूक प्रकरणातही सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर आगपाखड केली होती. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याविरोधात जाहीर बोलले. पण, वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर त्यांची दिलजमाई झाली. पण, अजूनही काही जणांना नाना पटोले यांच्याकडे असलेले अध्यक्षपद नको आहे. त्यासाठी अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता ही धूसफूस रायपूर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त होणार आहे.

शिवाजी मोघे यांचे समर्थक सरसावले

छत्तीसगड येथील राजपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ८५ वावे अधिवेशन होत आहे. आजपासून या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अशावेळी तिथं पुन्हा नाना पटोले यांच्या अध्यक्षपदावरून तक्रारी होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्याऐवजी शिवाजी मोघे यांचे नाव पुढं येत आहे. शिवाजी मोघे समर्थकांनी पटोले यांच्याऐवजी मोघे यांना प्रदेश अध्यक्ष करावे, अशी थेट मागणीच केली आहे. त्यामुळे या अधिवेशनात काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते, यावर नाना पटोले यांच्या प्रदेश अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.