पंतप्रधान पदासाठी तुमचा चेहरा कोण? खरगेंचं उत्तर, भाजपला आयतं कोलित, काय घडलं?

| Updated on: Oct 13, 2022 | 9:22 AM

मला आधी काँग्रेसचा अध्यक्ष तर बनू द्या, त्यानंतर पाहीन... मल्लिकार्जून खरगेंनी अगदी हसत हसत दिलेलं हे उत्तरच सोशल मीडियाने हेरलं.

पंतप्रधान पदासाठी तुमचा चेहरा कोण? खरगेंचं उत्तर, भाजपला आयतं कोलित, काय घडलं?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) माळ गळ्यात पडण्यापूर्वीच मल्लिकार्जून खरगेंचं (Mallikarjun kharge) वक्तव्य सध्या देशात चर्चेत आहे. खरगे सध्या निवडणूक प्रचारावर आहेत. मध्य प्रदेशात असताना भोपाळच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला. काँग्रेसचा पंतप्रधान (Prime minister) पदाचा चेहरा कोण असेल? यावेळी खरगेंनी उत्तर दिलं, मी सध्या तर निवडणूक प्रचारासाठी आलोय. हमारे यहाँ एक कहावत होती है… बकरीद मे बचेंगे तो मोहर्रम मे नाचेंगे… पहले मेरा चुनाव तो खत्म होने दो…

मला आधी काँग्रेसचा अध्यक्ष तर बनू द्या, त्यानंतर पाहीन… मल्लिकार्जून खरगेंनी अगदी हसत हसत दिलेलं हे उत्तरच सोशल मीडियाने हेरलं.

मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारं हे वाक्य असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतो..

भाजपचे नेते शहजाद पूनावाला यांनी यावर जोरदार टीका केली आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी मोहर्रम हा उत्सवाचा नव्हे तर दुखवट्याचा महिना असतो. खरगेंचं हे वक्तव्य मुस्लिमांचा अपमान करणारं आहे, असं ते म्हणालेत.

भाजपच्या आयसेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, हे वक्तव्य खूपच असंवेदनशील आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसला अस्तित्व टिकवणंच कठीण झालंय…

मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर या दोघांदरम्यान काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. याच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे सध्या दौऱ्यावर आहेत.

मध्य प्रदेशमधील पत्रकार परिषदेत खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. राजकीय दरोडे घालत भाजप लोकशाहीची लूट करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

भाजपने मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सरकार पाडलं. गोवा आणि महाराष्ट्रातही काळ्या पैशांच्या माध्यमातून सत्ता मिळवली. हे लोकशाहीविरोधात आहे. आम्ही याविरोधात संघर्ष करणार. घटनात्मक संस्थांची पुनर्स्थापना करणार, असं आश्वासन खरगे यांनी दिलं.