मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यात सत्ता संघर्षावरून वाद पेटला असतानाच आता दसरा मेळाव्यावरून(Shivsena Dasara Melava 2022) देखील वादाची ठिणगी पडली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची मागणी केली आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घ्या, विनंती नव्हे तर आग्रह असल्याचे कुडाळकर यांनी पत्रात म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात संबोधित करावे आणि क्रांतीकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड करावा असेही मंगेश कुडाळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
हिंदूत्वाचा विचार आपण घेऊन एक क्रांतीकारी निर्णय घेतला आता हिंदूत्वाचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथून येणाऱ्या दसरा मेळावा घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशा द्या…. माझी आपल्याला विनंती आहे एकनाथ शिंदे यांनी हा क्रांतीकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड आपण दसरा मेळाव्यात करावा….त्यामुळे आपण शिवाज पार्क येथे दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात घमासान सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.
हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत. तर दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत.