वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वातावरण हळूहळू तापू लागलंय. या मतदारसंघात बंजारा, मुस्लीम, मराठा, आदिवासी या जातींचं समीकरण आहे. बंजारा समाजातील राजकारण आणि विरोधात दमदार मराठा उमेदवार न मिळाल्याने आतापर्यंत या मतदारसंघावर गवळी कुटुंबाचे वर्चस्व राहिले. शिवसेनेच्या भावना गवळी या सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु यंदाही जातीचे योग्य समीकरण जुळविणाऱ्याच्या पारड्यात मतदार कौल टाकतील अशी स्थिती आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार यात शंका नाही. अनेक वर्षे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेस-शिवसेना असाच सामना रंगणार आहे.
भावना गवळींविरोधात काँग्रेसकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघांत गेल्या एका वर्षांपासून गावागावात भेटीगाठी, भूमीपूजनाच्या निमित्ताने त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदारसंघात जनसंपर्कही वाढविला आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी जाहीर करून तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेला आव्हान असेल यात मात्र शंका नाही.
वाशिम जिल्हा हा वाशिम-यवतमाळ आणि अकोला अशा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला आहे. जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव दोन तालुके अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असून वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा असे चार तालुके हे वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.
वाशिम आणि यवतमाळमधील काही विधानसभा मतदारसंघ मिळून यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.