डोळेबंद, पोटदुखीचा त्रास वाढला…मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली; अखेर गुरू धावले…

| Updated on: Feb 15, 2024 | 2:26 PM

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धाराशिवच्या सांजा गावातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. बैलगाडी, दुचाकी घेऊन या मराठा तरुणांनी धाराशिव शहराकडे कूच केली आहे. यावेळी धाराशिव बेमूदत बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकार विरोधात घोषणा देत धाराशिव बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

डोळेबंद, पोटदुखीचा त्रास वाढला...मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली; अखेर गुरू धावले...
manoj jarange patil
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जालना | 15 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी पाणी सुद्धा पिणं बंद केलं आहे. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे. उपचार घेण्यास मना केलं आहे. त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे. मनोज जरांगे यांना सर्वजण पाणी तरी प्या असा आग्रह करत आहेत. एका चिमुकलीनेही जरांगे काका पाणी प्या, अशी विनवणी केली आहे. पण जरांगे कुणाचेही ऐकेनात. कुणालाही प्रतिसाद देत नाहीत. आधी अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मगच पाणी घेतो असं त्यांनी म्हटलंय.

मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी अन्न त्याग सुरू केला आहे. पाणी पिणंही बंद केलं आहे. त्यामुळे जरांगे अशक्त झाले आहेत. त्यांना थकवा जाणवत आहे. त्यांनी पाणी प्यावं म्हणून लोक विनवणी करत आहेत. पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं.

पोटदुखीचा त्रास सुरू

काल जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. झोपेतच त्यांना सलाईन लावली होती. पण जाग येताच त्यांनी सलाईन काढून टाकली. आजही त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांचे डोळे उघडत नाहीये. त्यातच पोटदुखीचा त्रासही वाढला आहे. पण जरांगे उपचार घ्यायला तयार नाहीत. पाणी प्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे समाजबांधवांची चिंता वाढली आहे. सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. पण जरांगे निपचित पडून आहेत.

गुरूही धावले

नारायणगडचे महंत शिवाजी महाराज हे मनोज जरांगे यांचे गुरू आहेत. त्यांना जरांगे यांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांनी अंतरवली सराटी गाठली. महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली. पण जरांगे हे गुरूचंही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे टेन्शन अधिकच वाढलं आहे.

पुण्यात महाआरती

जरांगे यांना बरं वाटावं म्हणून पुण्यात सकल मराठा समाजातर्फे सामूहिक आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकल मराठा समाजातर्फे महा आरतीचे आयोजन करण्यात आलं होतं.

जरांगेंसाठी रुद्राभिषेक

मराठा आरक्षणाच्या अनुसरून विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळल्याने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक केला. मनोज जरंगे पाटलांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो यासाठी त्रंबकेश्वर मंदिरात ही पूजा करण्यात आली.