उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानुसार अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत. पण एकाच मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या उमेदवारांबाबत मनोज जरांगे आज अंतिम फैसला करणार आहे. पण त्यापूर्वीच मराठवाड्यातील कोणत्या मतदारसंघात जरांगे उमेदवार देणार आहेत याची माहिती समोर आली आहे. काही मतदारसंघांची नावे समोर आल्याने या मतदारसंघातील प्रस्थापित उमेदवारांच्या काळजात धस्स झालं आहे.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत उमेदवार आणि मतदारसंघ फायनल करण्याचं काम करत आहेत. मुस्लिम, मराठा आणि दलित नेतेही यावेळी उपस्थित आहेत. प्रत्येक मतदारसंघावर विचार सुरू आहे. आधी मराठवाड्यातील एकूण 46 मतदारसंघांवर चर्चा करण्यात येत आहे. त्यातही संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील मतदारसंघांवर आधी चर्चा केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात किती मुस्लिम आहेत, किती दलित आहेत आणि किती मराठा आहेत याची संख्या काढली जात आहेत. ज्या मतदारसंघात ज्या समाजाचे मतदार आणि ताकद जास्त त्या मतदारसंघात त्याच समाजातील उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे.
मराठवाड्यात एकूण 46 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय तिन्ही समुदायाचे लोक पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने या 46 मतदारसंघांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी प्रस्थापित उमेदवारांना घरी बसावं लागणार असल्याचं चित्र आहे. ज्या मतदारसंघात तिन्ही समाजाची ताकद नाही, तिथे प्रस्थापित उमेदवारांना पाडण्यात येणार आहे. त्यानुसार रणनीती आखली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सध्या केज, मंठा, भोकरदन, फुलंब्री, कळमनुरी आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. कळमनुरीत महायुतीचे संतोष बांगर उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे संतोष तारपे आहेत. बीडमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे लढत आहेत. तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे लढत आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बदनापूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.