पंढरपूर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीसा दिलासा मिळाला आहे. निवडणुकांसाठी राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा (Maratha Kranti Morcha backs NCP) जाहीर केला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने भाजप सरकारविरोधात राज्यभरात रान उठवले होते. लोकसभा निवडणुकीतही सकल मराठा समाजाने भाजप-शिवसेनेला विरोध केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्यातील सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपुरातील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय (Maratha Kranti Morcha backs NCP) घेण्यात आला. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही घोषणा केली.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला लागलेली गळती आणि भाजपमध्ये होणाऱ्या मेगाभरतीमुळे आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. विद्यमान आमदारांनीच साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र सकल मराठा समाज पाठीशी उभा राहिल्याने महाआघाडीला काहीसं बळ मिळण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आणि मावळमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाले यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून घेतला आहे. बाळासाहेब हे पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेल्या बाळासाहेब नेवाले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने मावळमध्ये राष्ट्रवादीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.