कोल्हापूर | 25 जानेवारी 2024 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवसरात्र काम करून शोधून काढल्या आहेत. येत्या 8 दिवसांत मागास आयोगाचं सर्व्हेक्षण पूर्ण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. सर्व्हेक्षणमधील त्रुटी मागासवर्गीय आयोगाला दाखवून देऊ. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हे खरं आहे की अनेक लोकांना ईडीच्या नोटीस दिल्या होत्या, मात्र त्यावेळी सुप्रियाताई दिसल्या नव्हत्या. रुपाली चाकणकर यांनी त्याची आठवण करून दिली असावी असाही टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर आणि परिसराचा विकास करायचा आहे. याबाबतचा सुमारे 1000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. 29 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या आरखाड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यामुळे कोल्हापूरची प्रगती होणार आहे. आजूबाजूच्या परिसराला मोठा फायदा होणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. पाटगाव धरणातील पाणी देणार नाही अशी नागरिकांनी भूमिका घेतली आहे. अदानी ग्रुपने हा प्रकल्प रद्द केला आहे., हा लोकांचा विजय असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांना नोटीस आल्यानंतर सुप्रिया सुळे आल्या. रोहीत पवार यांनी त्यांचे आशीवार्द घेतल्याची छायाचित्रात आणि प्रसारमाध्यमात दिसत आहे. यावर प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की हे खरे आहे की अनेक लोकांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या. मात्र त्यावेळी सुप्रियाताई दिसल्या नाही. रुपाली चाकणकर यांनी त्याची आठवण करून दिली असावी असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशच्या हितासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना ‘जननायक’ ही पदवी देणे योग्यच असल्याचे मतही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. ईडीच्या विषयात आम्हाला कोर्टाने दिलासा दिला आहे. अजून प्रकरण कोर्टात चालू आहे. संजय राऊत हे देखील जामिनावर बाहेर आले आहेत. आम्ही कोर्टात आमची बाजू मांडू असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.