मुंबई : मराठा आरक्षणावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब करत, राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा दिलासा दिला. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपवादात्मक आणि अपरिहार्य परिस्थितीत, आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलांडता येते, असं कोर्टाने नमूद केलं. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.
याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणाले, “अतिशय आनंदाचा क्षण आहे. ज्या गोष्टीची सर्वांना इच्छा होती की हे लवकर व्हावे, त्यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्याची सुरुवात काँग्रेस सरकारच्या राजवटीत झाली होती. त्याला आज अंतिम स्वरूप मिळाले आहे. हा कुठल्या पक्षाचा विजय नाही. ना भाजप ना शिवसेनेचा. हा सकल मराठा समाजाचा विजय आहे ज्यांनी 58 मोर्चे काढले. मोर्चात लाखो लोक सहभागी झाले. जवळपास 40 जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मला वाटते त्यांचे योगदान विसरता येणार नाही. हायकोर्टाने मागासवर्ग आयोगाने साथ दिली. त्याचा सर्वांना आनंद आहे”
आरक्षण कमी केलंय हा कायदेशीर मुदा आहे. जो पर्यंत पूर्ण निकाल वाचत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. पण 13 टक्के वाईट नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणाचे श्रेय सकल मराठा समाजाचे आहे, आता मुस्लिम आणि धनगर समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजप-शिवसेना सर्व गोष्टींचा फायदा उचलतात. आधी पुलवामाचा उचलला, आता ह्या गोष्टीचा उचलतील, पण सर्वांना माहीत आहे त्यांचे प्रेम किती तकलादू आहे, असा टोमणा अशोक चव्हाण यांनी लगावला.