मुंबई : मुंबईतील मराठी मतदारांवर मनसेच्या तुलनेत शिवसेनेचा प्रभाव अधिक असल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. मराठीबहुल भागातील मतदारांनीही मनसेपेक्षा शिवसेनेला पसंती दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीमध्ये (Marathi Voters choose Shivsena over MNS) पाहायला मिळत आहे.
शिवसेनेने मुंबईत विधानसभेच्या 14 जागा जिंकल्या. यापैकी भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या आठ मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. हे आठही मतदारसंघ 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेने जिंकले होते. परंतु, यावेळी मनसेचा पर्याय असतानाही मतदारांनी शिवसेना उमेदवारांना निवडून दिलं आहे. भांडुप पश्चिममध्ये तर मुंबईतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती.
विशेष म्हणजे या मतदारसंघांत सेना उमेदवारांना 20 हजार ते 67 हजार या दरम्यान मताधिक्य मिळालं आहे. काँग्रेस-भाजपसारख्या पक्षांवरुन मराठी मतदारांचा विश्वास उडाल्यामुळे शिवसेनेला पसंती मिळत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
मतदारसंघ – शिवसेना आमदार – मताधिक्य
वरळी – आदित्य ठाकरे – 67 हजार 427 (मनसे उमेदवार नाही)
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – 58 हजार 787 (मनसे उमेदवार नाही)
मागाठणे – प्रकाश सुर्वे – 49 हजार 146 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे नयन कदम (41 हजार 015 मतं)
दिंडोशी – सुनिल प्रभू – 44 हजार 511 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे अरुण सुर्वे (25 हजार 834 मतं)
शिवडी – अजय चौधरी – 39 हजार 330 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संतोष नलावडे (38 हजार 350 मतं)
भांडुप पश्चिम – रमेश कोरगांवकर – 29 हजार 173 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप जळगावकर (42 हजार 782 मतं)
विक्रोळी – सुनिल राऊत – 27 हजार 841 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे विनोद शिंदे (16 हजार 008 मतं)
माहिम – सदा सरवणकर – 18 हजार 647 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप देशपांडे (42 हजार 690 मतं)
शिवसेनेने भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या मूळ मुद्द्यापासून काहीशी फारकत घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला असला, तरी मराठी मतदारांनी मनसेच्या तुलनेत शिवसेनेलाच पसंती (Marathi Voters choose Shivsena over MNS) दिल्याचं दिसत आहे.
मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर
गुजराती समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्यामुळे मराठी माणूस शिवसेनेला पसंती देत आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत फारशी चमक दाखवता आलेली नाही. शिवसेनेने आपल्या मूळ मुद्द्याला बगल दिल्यानंतर मनसे मराठी मतदारांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात.
14 पैकी ज्या उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्रमाण कमी आहे, तिथेही शिवसेनेने चांगलं मताधिक्य घेतलं आहे. त्यामुळे कोणे एके काळी मनसेची निवड करणारे मराठी मतदार (Marathi Voters choose Shivsena over MNS) पुन्हा शिवसेनेकडे वळल्याचं चित्र आहे.