परळी : गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही. शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल; अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वाण टाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली आहे. (Dhananjay Munde promises to help flood affected farmers)
29-30 सप्टेंबरच्या रात्रीतून झालेल्या अतिवृष्टीने अनेकांना जीव मुठीत धरून बसावे लागले. मागील 25 वर्षांच्या काळात इतका पाऊस कधी झाला नव्हता. वाण नदीने विक्राळ स्वरूप धारण करत एका पात्राचे तीन पात्र केले. पाणी, दगड गोटे शेतांमध्ये शिरले. नुकसान पाहताना शेत कोणते आणि नदी पात्र कोणते असा सवाल मनात येतो आहे. त्यामुळे झालेले नुकसान हे पंचनामे करण्या पलीकडचे आहे, असंही मुंडे म्हणाले. या परिस्थितीची मुंडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परळी तालुक्यातील वाण टाकळी, नागापूर, लाडझरी तसेच नागदरा आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, विशेषकरून नदी काठच्या गावांमध्ये शेतातील पिकांचे 100 टक्के नुकसान तर झालेच आहे. मात्र, जमिनीतील माती अक्षरश: वाहून गेली आहे. त्यामुळे तिथे पंचनामे करण्यासारखे आता काही उरलेच नाही. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेलच शिवाय पुढच्या हंगामात त्यांना जमिनी कसता याव्यात यासाठीही आम्ही मदत करणार असल्याचे मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं.
वाण नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेती सह, पूल रस्ते, घरे असे अतोनात नुकसान झाले आहे. मुंडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुठे तुटलेल्या पुलाच्या काठावरून, कुठे नदी पात्रात दगड गोट्यांमधून वाट काढत, तर कुठे वाहून गेलेल्या रस्त्यातून वाट शोधत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
29 सप्टेंबर च्या रात्री उशिरा जेव्हा अतिवृष्टीने पूर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे फोन येत होते, तेव्हा सर्व मदत व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना मी स्वतः फोनवरून बोलून सूचना देत होतो. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्र जागून काढली. पुरात शेतात, झाडावर आसरा घेतलेल्या नागरिकांना तत्परतेने सुरक्षित बाहेर काढले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, याचे समाधान आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत बचाव व मदत कार्य केलेल्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे विशेष कौतुक करतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
इतर बातम्या :
बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा
पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!
Dhananjay Munde promises to help flood affected farmers