दत्ता कनवटे, औरंगाबादः मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल (Election result) पुढील काही तासात येईल. मात्र निवडणुकीचा पहिला कौल हाती आला असताना औरंगाबादकरांना (Aurangabad) धक्का बसणारे निकाल समोर आले आहेत. मतमोजणीच्या प्राथमिक फेरीत प्रमुख दावेदारांना मागे सारत शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अत्यंत चुरशीच्या या लढतीत हा कौल सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचं चित्र आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघातून तीन टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. तर भाजपने किरण पाटील या नवख्या उमेदवारावर प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराज झालेले प्रदीप साळुंखे यांनीही विक्रम काळेंना आव्हान दिलंय. या तीन उमेदवारांमध्ये चुरस रंगण्याचं म्हटलं जात असतानाच शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
तर विक्रम काळे तसेच किरण पाटील पिछाडीवर असल्याचं दिसून आलंय. प्रचारादरम्यान, सूर्यकांत विश्वासराव यांचा फार तामझाम पहायला मिळाला नव्हता. याउलट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार झाला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सूर्यकांत विश्वासराव यांनी आघाडी घेतल्याने निकाल फिरतो की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनुसार, ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची 60 मतं मिळाल्याचं दिसून येतंय. बाळाराम पाटील हे पिछाडीवर आहेत. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच माझा विजय निश्चित आहे, असं चॅलेंज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलंय.
महाराष्ट्रातील आजच्या पाच विधान परिषद निवडणुकांत भाजपाच विजयी होणार, असा आत्मविश्वास भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. जालन्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही पाचही जिंकू, असं वक्तव्य त्यांनी केलंय.