औरंगाबादः राज्यभरातील विधान परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणीही सकाळीच सुरु झाली आहे. शिक्षक आमदार (Teachers MLA) होण्याचा मान कुणाला मिळणार, हा निकाल येत्या काही तासांत येणार आहे. या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात असून जवळपास 53 हजार 257 शिक्षकांनी मतदान केलंय. महाविकास आघाडीचे विक्रम काळे आणि भाजप युतीचे किरण पाटील यांच्यात प्रमुख लढत असल्याचं दिसून येतंय. प्रत्यक्ष मतमोजणीत मत विभाजनानंतर काय स्थिती होते, गेमचेंजर कोण ठरतो, हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.
मागील तीन टर्म निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांनाच महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपने किरण पाटील यांच्यासारख्या नव्या उमेदवारावर बळ लावलंय. नेहमीप्रमाणे भाजपने याही निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी विक्रम काळे आणि किरण पाटील दोघेही कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार शिक्षकांचा आमदार कोण हे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रदीप सोळंके हेदेखील रिंगणात असल्याने ही तिरंगी लढत होणार असल्याचंही म्हटलं जातंय. आज सकाळीच निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय त्यावेळी तिन्ही उमेदवार एकत्र दिसून आले. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. या कंपनीच्या शेड्समध्ये सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
विक्रम काळे यांनी टीव्ही 9ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ मी कुणाच्या विरोधात उभा नव्हतो, मी स्वतंत्र उभा होतो. पण मला पाडण्यासाठी अनेक उमेदवार उभे राहिले आहेत. पण ही शेवटी सूज्ञ मतदारांची निवडणूक आहे. ते योग्य निकाल देतील. तर निवडणुकीत कुणीही जिंकलं तरी शिक्षकांच्या कामासाठी आम्ही सदैव एकत्रितपणे प्रयत्न करू, अशी भूमिका भाजपचे किरण पाटील यांनी मांडली.
नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे तसेच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या सत्यजित तांबेंच्या मतांकडे राज्याचं लक्ष लागलंय.
अमरावती पदवीधर मतदारसंघात मविआचे धीरज लिंगाडे विरुद्ध भाजपचे रणजित पाटील असा सामना रंगतोय. यासाठी अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यातून मतदान झालं.
नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी केलेले सतीश इटकेलवार हेदेखील मैदानात आहेत. तर अपक्ष उमेदवार नागो गाणार यांच्या मतांकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.